येथील अग्रणी बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वारणा सहकारी बँकेच्या २९ व्या शाखेचे बुधवारी सांगली येथील गणपती पेठ येथे श्रीमती शोभाताई कोरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. आमदार विनय कोरे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. बँकेच्या उद्घाटनप्रसंगी पहिल्या दिवशी ४ कोटी रुपयांच्या ठेवी मिळवत संकलनाचा उच्चांक गाठला. शाखेच्या उद््घाटनप्रसंगी शहरातील तसेच आसपासच्या परिसरातील मोठे व्यापारी, हितचिंतक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.    
ग्रामीण भागातून येऊन शहरी शाखांपर्यंत उत्कृष्ट काम करणाऱ्या वारणा बँकेने सांगली सांगली व आसपासच्या भागातील जनतेला आपलं समजून आपुलकीच्या नात्यानं सेवा सुरू केलेले हे नवीन दालन सर्वाना नवीन शक्ती आणि विश्वास देणारे दालन ठरेल, असा विश्वास आमदार कोरे यांनी या वेळी व्यक्त केला.
बँकेचे अध्यक्ष निपुण कोरे म्हणाले, की मार्केट यार्ड सांगली येथील शाखेला यापूर्वीच १२ वर्षे पूर्ण झाली असून त्या शाखेत आज ४१ कोटी ९८ लाख इतक्या ठेवी असून कर्जे ४१ कोटी ५८ लाख झाली आहेत. तर नफा १ कोटी २७ लाख झाला असून बँकेच्या एकूण नफ्याच्या तुलनेत २५ टक्के वाटा या शाखेने उचलला असून सांगलीकरांनी मोठा विश्वास आमच्यावर टाकल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. संपूर्ण महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र असलेल्या वारणा बँकेने आज ५४८.९६ कोटी ठेव संकलन केले असून ३७०.८० कोटींपेक्षा जास्त कर्ज वितरण केले आहे. बँकेचा आज एकूण व्यवसाय ९०० कोटींपेक्षा जास्त असून लवकरच हा आकडा १ हजार कोटीचा टप्पा ओलांडण्याच्या दिशेने बँकेने वाटचाल सुरू केली आहे.    या वेळी बँकेचे उपाध्यक्ष उत्तम पाटील, ज्येष्ठ संचालक प्रमोद कोरे, बसवेश्वर डोईजड, संचालक, संचालिका, बँकेचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी यांच्यासह नागरिक व ठेवीदार मोठय़ा संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक विकास लंगरे यांनी केले.