लोकसंख्येच्या अवघ्या १० टक्के लोकांकडेही चारचाकी गाडय़ा नाहीत. मात्र मुंबईतील बहुतांश मूलभूत सुविधांच्या प्रकल्पांमध्ये चारचाकी वाहनांचाच विचार केला जातो. या पाश्र्वभूमीवर लाखो नागरिकांची जीवनवाहिनी असलेली बेस्टसारखी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था एकीकडे तोटय़ात चालत असताना वाहनांच्या पार्किंग शुल्कात वाढ करण्याच्या प्रस्तावाला विरोधी नगरसेवकांनी कडाडून विरोध केला आहे. संतापाची बाब म्हणजे या श्रीमंत कारमालकाचा पुळका आलेले पालिकेतील हे विरोधी पक्षनेते ‘कारमालकांवर महागाई लादली जाऊ नये’, ‘कारची संख्या वाढणारच. मात्र पार्किंग शुल्क वाढवणे हा उपाय नाही.’ अशी कारणे देत आहेत. मात्र सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कणा मजबूत करण्यासाठी पार्किंग शुल्क वाढवलेच पाहिजे, अशी वाहतूकतज्ज्ञांची मागणी आहे.
नागरिकांना सुविधा देण्याऐवजी त्यांना शुल्काचा डोस देणे अन्यायकारक असल्याची भूमिका नगरसेवकांनी मांडली आहे. सध्या सुरू असलेल्या १५ रुपये प्रतितास या शुल्कात चौपटीने वाढ करून दक्षिण मुंबई तसेच रेल्वेस्थानके, बाजारपेठा अशा गर्दीच्या ठिकाणी पार्किंगसाठी प्रति तास ६० रुपये शुल्क करण्याचा प्रस्ताव २८ नोव्हेंबर रोजी सुधार समितीत चर्चेला येणार आहे. हा प्रस्ताव मान्य झाल्यास रात्री इमारतीबाहेर रस्त्यावर गाडय़ा पार्क करणाऱ्यांनाही शुल्क द्यावे लागेल. या शुल्कवाढीमुळे रस्त्यावर कारची संख्या मर्यादित राहील व वाहतूक कोंडीतून मुक्त झाल्याने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट होईल, असे वाहतूक तज्ज्ञांचे मत आहे.
सुधार समितीचे अध्यक्ष राम बारोट यांनीही अशा प्रकारच्या शुल्कवाढीमुळे दक्षिण मुंबई तसेच गर्दीचे रस्ते मोकळे होण्याची आशा व्यक्त केली आहे. मात्र विरोधी नगरसेवकांना पार्किंग शुल्कात वाढ करणे अमान्य आहे.
विरोधी पक्षांच्या सर्वच नेत्यांनी पार्किंग दरवाढीला नकारघंटा वाजवली आहे. मनसेने पार्किंगशुल्कातील वाढीला सहमती दर्शवली असली तरी रात्रीच्या वेळी रस्त्याकडेला होत असलेल्या पार्किंगला शुल्क नको, अशी भूमिका घेतली आहे.

माझ्या मते..
*नागरिकांना सेवा देणे आवश्यक असताना महागाई त्यांच्यावर लादली जाऊ नये. पार्किंगसाठी पालिकेने सोयी उपलब्ध करायला हव्यात. नव्याने उभ्या राहणाऱ्या इमारतींमध्ये एक किंवा दोन मजले पार्किंगसाठी राखीव ठेवायला हवेत. उपनगरातून शहरात कामासाठी येत असलेल्यांना कार पार्किंगसाठी सुविधा दिली पाहिजे. सोयी न देता केवळ शुल्कवाढ करणे अन्यायकारक आहेत. एवढी भरमसाठ शुल्कवाढ करण्यास आमचा विरोध राहील.
देवेंद्र (बाळा) आंबेरकर, काँग्रेस
*मोटारींची संख्या वाढत राहणार. मात्र पार्किंग शुल्क वाढवणे हा त्यावरचा उपाय नाही. १५ रुपयांवरून २५ रुपयांवर पार्किंग शुल्क नेणे समजू शकते. मात्र प्रस्तावित केलेली वाढ कितीतरी अधिक आहे. नागरिकांच्या अपेक्षाही लक्षात घेतल्या पाहिजेत.
धनंजय पिसाळ, राष्ट्रवादी काँग्रेस
*पालिकेकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या ‘पे अ‍ॅण्ड पार्क’ सुविधेसाठी शुल्क वाढवण्यास आमची सहमती आहे. मात्र रस्त्यावर पार्क करण्यात येणाऱ्या गाडय़ांना शुल्क लावले जाऊ नये.
संदीप देशपांडे, मनसे

शुल्क १०० रुपये प्रति तास करावे..
कार पार्किंगसाठी जागा हा नागरिकांचा हक्क नाही. ती केवळ सुविधा आहे. शहरातील केवळ दहा ते बारा टक्के लोक खासगी गाडय़ांचा उपयोग करतात. त्यांच्या गाडय़ांनी अडवलेल्या रस्त्यामुळे इतर ८० टक्के प्रवाशांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. मुंबईतील खासगी गाडय़ांमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत चालत नाही. ‘आधी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सांभाळा व नंतर खासगी गाडय़ा रोखा’ असे म्हटले जाते. मात्र हा ‘कोंबडी आधी की अंडे’ असा प्रकार आहे. खासगी गाडय़ा रोखल्याशिवाय आहे ती व्यवस्थाही नीट चालवणे अवघड बनले आहे. पालिकेच्या प्रस्तावात प्रतितास ६० रुपये शुल्क करण्याचे योजले आहे. मात्र सध्याची स्थितीत पाहता १०० रुपये प्रतितास शुल्क करणे योग्य ठरेल. त्यांच्या घरात गाडय़ा असल्या तरी त्याचा त्रास रस्त्यावरील वाहतुकीला होत नाही. आज पाच लाख रुपयात गाडी उपलब्ध झाली असली तरी तिच्यामुळे अडवल्या जाणाऱ्या रस्त्यावरील जागेची किंमत कितीतरी जास्त आहे. त्या जागेची किंमत कारमालकाने उचलायला हवी. न्यूयॉर्क तसेच हाँगकाँगसारख्या टॉवर असलेल्या शहरात पार्किंगमधून नफा कमावला जातो व त्याचा उपयोग रस्त्यांची पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी होतो.
    अशोक दातार, वाहतूक तज्ज्ञ झ्र्

प्रस्तावात काय आहे
*पार्किंग लॉटची तीन भागात विभागणी.
*९७ पैकी ६२ जागी प्रति तास ६० रुपये शुल्क
*२४ ठिकाणी ४० रुपये प्रति तास तर
    उर्वरित ठिकाणी २० रुपये प्रति तास शुल्क
*रात्रीच्या वेळी रस्त्यावर गाडी पार्क
    करणाऱ्यांनाही एक तृतीयांश शुल्क द्यावे लागेल.
*रिक्षा तसेच टॅक्सींना शुल्कात ५० टक्के सवलत.