उन्हाळ्याच्या दिवसात शहरातील विविध भागातील पाणी टंचाई बघता नागरिकांना कुठल्याही क्षणी पाणी पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी प्रत्येक झोनमध्ये पाणी टंचाई निवारण कक्षाची स्थापन करण्यात येणार आहे. नागरिकांच्या तक्रारी स्वीकारून त्यांचे निरसन या कक्षाद्वारे करण्यात येणार आहे. हा विभाग सुटीच्या दिवशीही सुरू राहणार असून त्या ठिकाणी जलप्रदाय आणि ऑरेंज सिटी वॉटर वर्क्सचे कर्मचारी राहतील. झोन पातळीवर विविध विभागाच्या कर्मचाऱ्यांना घेऊन टिल्लु पंप जप्ती पथक तयार करूम जप्तीची मोहीम राबविण्याचे निर्देश महापालिका आयुक्त श्याम वर्धने यांनी दिले आहेत.
महापालिकेच्या जलप्रदाय विभागाच्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांकडे नागरिक पाण्याची समस्येसंदर्भात तक्रारी घेऊन गेले की ‘ही आमची जबाबदारी नाही ऑरेंज सिटी वॉटर वर्क्सच्या अधिकाऱ्यांना भेटा’ असे सांगून स्वत:ची जबाबदारी झटकतात. या मुद्यावर महापालिका सभेत सत्ता आणि विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी आयुक्तांना धारेवर धरले होते. महापालिकेने ऑरेंज सिटी वॉटर वर्क्सला २४ बाय ७ या योजनेचे कंत्राट दिले आहे त्यामुळे शहरातील पाण्याची जबाबदारी महापालिकेची असल्याचे सांगून प्रशासनाने जबाबदारी निश्चित करण्याचे निर्देश महापौर सोले यांनी सभागृहात दिले होते. आयुक्तांनी या संदर्भात गंभीर पावले उचलत जलप्रदाय विभाग आणि ऑरेंज सिटी वॉटर वर्क्स अधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन प्रत्येक झोनमध्ये पाणी टंचाई निवारण कक्ष स्थापन करण्याचे निर्देश दिले. पाणी पुरवठय़ाचे सुरळीत व्यवस्थापन व पाणी टंचाई निवारणाची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार झोनच्या लोककर्म विभागातर्फे विहिरी स्वच्छ करणे, त्यातील गाळ काढणे या कामावर तसेच झोन तंर्गत टँकरद्वारे पाणी पुरवठय़ाच्या कामावर पाणी टंचाई निवारण कक्षाद्वारे नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. लोककर्म विभागाचे उप अभियंता या कामावर लक्ष ठेवतील व त्यासाठी लागणाऱ्या बाबीचे प्रावधान जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता करतील. या पथकाच्या कार्याचा तपशील संबंधित झोनच्या सहायक आयुक्तांना कार्यकारी अभियंता तसेच जलप्रदाय विभागाचे कार्यकारी व समन्वयकांना कळवतील. नागरिकांकडून तक्रारी येताच ओसीडब्ल्यू कर्मचाऱ्यामार्फत समस्यांचे निरसन करण्यासाठी संबंधित जलप्रदाय विभागाचे उप अभियंत्याना मदत करतील.
पाणीपुरवठा प्रणालीच्या संचालनावर देखरेख जलशुद्धीकरण केंद्रावर कच्च्या पाण्याची उपलब्धता, विद्युत विभागाशी समन्वय, जलशुद्धीकरण केंद्रावर देखरेख ही कामे जलप्रदाय विभागाचे उप अभियंता यांच्या नियंत्रणात तर जलस्शुद्धीकरण केंद्रातून जलकुंभापर्यंत पाणी वितरण व्यवस्थेवर देखरेखीचे कामे जलप्रदाय विभागाचे उपविभागीय अभियंता यांच्या नियंत्रणात राहील.
या कामामध्ये ऑरेंजसिटी वॉटर वर्क्सचे कर्मचारी मदत करतील.
संग्रहित लेख, दिनांक 20th Apr 2013 रोजी प्रकाशित
प्रत्येक झोनमध्ये पाणी टंचाई निवारण कक्ष स्थापण्याचे निर्देश
उन्हाळ्याच्या दिवसात शहरातील विविध भागातील पाणी टंचाई बघता नागरिकांना कुठल्याही क्षणी पाणी पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी प्रत्येक झोनमध्ये पाणी टंचाई निवारण कक्षाची स्थापन करण्यात येणार आहे. नागरिकांच्या तक्रारी स्वीकारून त्यांचे निरसन या कक्षाद्वारे करण्यात येणार आहे.
First published on: 20-04-2013 at 02:55 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Order to perform water shortage prevention cell in every zone