काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी नागपूर दौऱ्यात सुपर स्पेशालिटीला भेट देणार आहेत. त्या अनुषंगाने राज्याचे वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांची रविवारी सुपर स्पेशालिटीमध्ये बैठक घेतली. या बैठकीत सुरक्षेच्या दृष्टीने आढावा घेण्यात आला.
२१ नोव्हेंबरला कस्तुरचंद पार्कवर सोनिया गांधी यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेनंतर त्या सुपर स्पेशालिटीला भेट देऊन राजीव गांधी जीवनदायी योजनेचा शुभारंभ करणार आहेत. या योजनेतील लाभार्थीशीही त्या संवाद साधणार असल्याचे समजते. या पाश्र्वभूमीवर रविवारी डॉ. शिनगारे यांनी सुपर स्पेशालिटीमध्ये बैठक घेतली. सोनिया गांधी यांनी भेट दिल्यास काय उपाययोजना केल्या पाहिजेत, यावर या बैठकीत उहापोह करण्यात आला. त्यादृष्टीने सुपर स्पेशालिटीने सज्ज राहावे, असे आदेश डॉ. शिनगारे यांनी यावेळी दिले.
या बैठकीस वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव आनंद कुळकर्णी मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार, सुपर स्पेशालिटीच्या अधीक्षक डॉ. वंदना अग्रवाल, हृदयरोग विभाग प्रमुख डॉ. मुकुंद देशपांडे यांच्यासह अन्य विभागाचे डॉक्टर उपस्थित होते. यानंतर डॉ. शिनगारे आणि आनंद कुळकर्णी यांनी सुपर स्पेशालिटी विभागातील हृदयरोग, मेंदूरोग व नेफ्रॉलॉजी विभागाला भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. बैठक होणार असल्याने रविवार असतानाही सुपर स्पेशालिटीमधील सर्व डॉक्टरांची सुटी रद्द करण्यात आली होती.