कोणत्याही औषधीच्या दुकानात सर्वाधिक विक्री होणाऱ्या गोळ्या या वेदनाशामक असतात. एकूण औषधांच्या तुलनेत वेदनाशामक गोळ्यांच्या विक्रीचे प्रमाण सुमारे ३० टक्के आहे. या गोळ्या डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय मिळत असल्या तरी त्या वापरताना सावधानता बाळगायला हवी. सतत वेदनाशामक गोळ्या घेतल्याने त्याचा सर्वाधिक परिणाम शरीरातील इतर अवयवांपेक्षा मूत्रपिंडावर होतो. त्यामुळे दुखणे कशाचे आहे, हे तपासून उपचार करावा, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
वेदनाशामक गोळ्या आजार बरा करत नाही. शरीरातील एखादा अवयव दुखू लागला, की तेथून मेंदूला रसायनांच्या माध्यमातून संदेश पाठवले जातात. पॅरासिटेमॉल असलेल्या गोळ्या मेंदूकडे येणारे व तेथून जाणारे वेदनेचे संदेश अडवण्याचे काम करतात आणि त्यामुळे वेदना होत असल्याचे लक्षात येत नाही. आयबुप्रोफेन असलेल्या गोळ्या वेदना होत असलेल्या ठिकाणी काम करतात. वेदना उत्पन्न करणाऱ्या रसायनांवर नियंत्रण ठेवून दाह कमी होतो. वेदनाशामक गोळ्यांमुळे फायदा होतो, पण काही वेळा गंभीर परिस्थितीही निर्माण होते. या गोळ्या थेट घेता येत असल्या तरी त्यांची गुणशक्ती वेगवेगळी असते. शंभरातील एका रुग्णाला एखाद्या गोळीनेही त्रास होतो. अॅस्पिरीनमुळे हृदय तसेच मेंदूकडे जाणाऱ्या वाहिन्यांत ब्लॉकेज निर्माण होतात. काही वेळा जठराला ओरखडे पडून रक्तस्राव होतो. सांधेदुखीसाठी देण्यात येणाऱ्या ‘कॉक्स टू इन्हिबीटर’मुळे मोठय़ा आतडय़ांमध्ये अल्सर झालेले रुग्ण उपचारासाठी येतात. काही गोळ्यांमुळे मूत्रपिंडावर प्रभाव पडतो, अशी माहिती सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील ज्येष्ठ पोटविकार तज्ज्ञ डॉ. सुधीर गुप्ता यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.
सांधेदुखी किंवा एखाद्या विशिष्ट ठिकाणी होत असलेल्या वेदनेसाठी आयबुप्रोफेन, डायक्लोफिनॅक उपयोगी पडतात. त्याचा परिणाम ८ ते १० तास असतो. या गोळ्या जेवणानंतरच घेणे योग्य असते. उपाशीपोटी कधीही घेऊ नये. कोणत्याही औषधीच्या दुकानात व केव्हाही या गोळ्या मिळत असल्याने अनेक नागरिक थोडी जरी वेदना झाली की त्याचे सेवन करतात. वेदना होत नसताना अधिक काळ या गोळ्या घेतल्यास पोट बिघडणे, रक्तस्राव व हृदयाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गोळ्या घेऊ नये. उच्च रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह असे आजार असलेल्यांनी कोणतीही औषधे स्वत:च्या मनाने घेऊ नयेत. या आजारांसाठी सुरू असलेल्या औषधांसोबत नेमक्या कोणत्या वेदनाशामक योग्य ठरतील, यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असेही डॉ. गुप्ता यांनी सांगितले.
मूळ कारणांवर उपाय करणे आवश्यक
वेदनाशामक गोळी घेण्यापूर्वी वेदना नेमकी का होत आहे आणि ते कारण कमी करता येईल का, याचाही विचार व्हायला हवा. दुखणे हे नैसर्गिक असून ते लक्षण आहे. वेदनाशामक गोळी घेण्याचे कारणे डोकेदुखी, दातदुखी, अंगदुखी असू शकते. डोके दुखत असेल तर त्यामागे अपुरी झोप, सर्दी, ताण, उपवास अशी कारणे असू शकतात. गोळी इन्स्टंट रिलिफ देत असली तरी मूळ कारणावर उपाय केला तर पुन्हा पुन्हा गोळ्यांकडे वळावे लागणार नाही. वेदनाशामक गोळी हा केवळ तात्पुरता उपाय आहे. सतत गोळ्या घेतल्याने त्याचा परिणाम मूत्रपिंड आणि मेंदूवरही होतो. खूप वेदना होत असल्यास डॉक्टरांकडे जाण्याच्या वेळेपुरते आराम पडावा यासाठीच त्याचा उपयोग करावा, असे मत श्वास विकार व अॅलर्जी तज्ज्ञ डॉ. अशोक अरबट यांनी व्यक्त केले.
संग्रहित लेख, दिनांक 5th May 2015 रोजी प्रकाशित
सतत वेदनाशामक गोळ्या घेणे धोक्याचे
कोणत्याही औषधीच्या दुकानात सर्वाधिक विक्री होणाऱ्या गोळ्या या वेदनाशामक असतात.

First published on: 05-05-2015 at 07:26 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Painkiller tablets are harmful