राज्याच्या महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी शासकीय मुलींच्या बालगृहाला भेट देऊन परिसराचे निरीक्षण केले. यावेळी भारतीय स्त्रीशक्तीच्या एका शिष्टमंडळाने विविध मागण्यांचे निवेदन त्यांना दिले. भारतीय स्त्रीशक्तीतर्फे सीताबर्डी आणि प्रतापनगर पोलीस ठाणे परिसरात दोन समुपदेशन केंद्र चालविण्यात येतात. तसेच कुटुंब न्यायालय परिसरात निशुल्क पाळणाघर चालवले जाते. नागपुरातील १८ वषार्ंखालील अनाथ मुलींच्या शासकीय बालगृहात स्त्रीशक्तीतर्फे २००६ पासून समुपदेशनाचे काम केले जाते. या बालगृहातील लाभार्थीना शासनाच्या उदासीनतेमुळे अनुदानाअभावी प्राथमिक सुविधा मिळत नसल्याकडे पंकजा मुंडे यांचे लक्ष वेधण्यात आले.
निवासी संस्थामधील कर्मचाऱ्यांसाठी नियमितपणे संवेदनशीलता वाढवण्यासाठी कार्यशाळांचे आयोजन करण्यात यावे, कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी नियमानुसार कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात याव्या, मुलांच्या जीवनावश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी अनुदानाच्या रकमेत वाढ करण्यात यावी, मुलांच्या संरक्षणाच्या दृष्टीने इमारतीत सुविधा असाव्यात.
 तसेच राज्य बाल संरक्षण कक्ष व जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे कामकाज सर्वसमावेशक असावे, महाराष्ट्रात मुलींसाठी किमान विभागश: एक प्रमाणे निरीक्षण गृह असावे, मुलींच्या संस्थांमध्ये स्त्री अधीक्षिकांचीच नियुक्ती करण्यात यावी व अधीक्षकांना बालगृहाच्या परिसरातच निवासाची सक्ती असावी, अशा मागण्यांचे निवेदन मुंडे यांना देण्यात आले.
मुंडे यांना निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात स्त्रीशक्तीच्या अध्यक्ष हर्षदा पुरेकर,
सचिव राधिका देशपांडे, संघटनमंत्री रोहिणी काशीकर, कार्यालय मंत्री मीना बक्षी, कोषाध्यक्ष अपर्णा शिरपूरकर आणि अ‍ॅड. पद्मा चांदेकर उपस्थित होत्या.