मध्य रेल्वेला २६ कोटी रुपयांहून अधिक उत्पन्न देणारा मलकापूर रेल्वे स्थानकावरील मालधक्का अत्यावश्यक सुविधांअभावी उपेक्षित व असुरक्षित झाला असून या परिसरात चोरटय़ांचे देखील साम्राज्य निर्माण झाले आहे.
विदर्भाचे प्रवेशद्वार असलेल्या बुलढाणा जिल्ह्य़ातील मलकापूर रेल्वेस्थानक  उपेक्षित व दुर्लक्षित राहिले आहे. जिल्ह्य़ात इंग्रजांच्या काळापासून केवळ ५७ किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग आहे. या रेल्वेमार्गावर फक्त मलकापूरला रेल्वे रॅक पॉइर्ंट आहे.
जिल्ह्य़ाच्या औद्योगिक विकासाला चालना मिळावी, शेतकऱ्यांच्या शेती मालाला योग्य भाव मिळावा, तसेच रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी तत्कालीन खासदार आनंदराव अडसूळ यांच्यासह पारसमल झाबक व जिल्हा प्रवासी संघाने पाठपुरावा करून मध्य रेल्वेकडून मलकापूर येथे रॅक पॉइंट मिळवून घेतला. या ठिकाणी कोणत्याही सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या नाही तरी देखील या पॉइंटपासून रेल्वेला दरवर्षी २६ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत आहे.
या मालधक्क्यावरून जवळपास १५० रॅकची गेल्या वर्षांत आयात-निर्यात झाली. एक रॅक म्हणजे सुमारे ४२ ते ४८ व्ॉगन माल असतो. त्यानुसार या वर्षांत सहा हजार ५०० व्ॉगन माल भारतातील विविध भागांसह परदेशातही पाठविण्यात आला. त्यामुळे व्यापारी, खरेदीदार, परप्रांतीय उत्पादक येथे येऊ लागले आहेत. या माध्यमातून शेकडो मजुरांनाही काम उपलब्ध झाले आहे. एका वर्षांत या रॅक पॉइंटच्या माध्यमातून रेल्वेला सुमारे २६ कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे.
रेल्वेला कोटय़वधी रुपयांचे उत्पन्न मिळवून देणाऱ्या या रॅक पॉइंटवर मात्र कोणत्याही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत. पिण्याच्या पाण्याची येथे सुविधा नाही, रस्तेही नाहीत, संरक्षक भिंत कोसळलेली आहे. त्यामुळे शेतमालाची चोरी होण्याचे प्रमाण वाढले आहे. एका रॅकवर किमान ५०-६० क्विंटल मालाची चोरी होत असल्याचे सांगितले जाते. रॅकवर येणाऱ्या वाहनांना रेल्वे स्थानकाजवळ ऑटोरिक्षांची गर्दी असल्याने अनेकदा अपघात होतो. ऑटोरिक्षांच्या गर्दीमुळे अनेकदा वाद होतात आणि वाहतूकही विस्कळीत होते. या कामासाठी स्वतंत्र सुसज्ज कार्यालय नसून केवळ दोनच व्यक्ती कामकाज पाहतात, त्यामुळे त्यांच्यावर कामाचा ताण पडतो. साहजिकच कामाला गती रहात नाही.
या रेल्वे रॅक पॉइंटसाठी आवश्यक सुविधा, स्वतंत्र कार्यालय, पुरेसा कर्मचारी वर्ग व पॉइंटला जोडणारा मालवाहतुकीचा चांगला रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आहे.