या वर्षीचा परिवर्तनचा पुरस्कार युवा नाटककार राजकुमार तांगडे यांना देण्यात येणार आहे. २० वर्षांपासून बी. रघुनाथ स्मृतिसंध्येचे आयोजन नाथ परिवार व परिवर्तन संस्थेच्या वतीने केले जाते. साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना या संस्थेकडून पुरस्कार दिला जातो. ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता एकनाथ रंगमंदिरात सुप्रसिद्ध हिंदी कवी राजेश जोशी यांच्या हस्ते पुरस्कार दिला जाणार आहे.
बी. रघुनाथ स्मृतिसंध्या व रवींद्रनाथ टागोर यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमात टागोरांच्या कवितांवर आधारित ‘काव्येर कथा’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अभिनेते चंद्रकांत काळे दिग्दर्शित या कार्यक्रमात प्राची दुबळे यांचे गायन, मंदार कुलकर्णी, स्वामिनी पंडित, चंद्रकांत काळे यांचे काव्यवाचन होणार असून या वेळी संतूरवर दिलीप काळे व व्हायोलिनवर अवधूत रहाळकर साथसंगत करणार आहेत.
परिवर्तन पुरस्कार प्रतिष्ठेचा मानला जातो. यापूर्वी विजय पाडाळकर, रंगनाथ पठारे, नारायणराव कुलकर्णी कवठेकर, फ. मुं. िशदे, श्रीकांत देशमुख, जगदीश कदम, भास्कर चंदनशिव, निरंजन उजगरे, ललिता गादगे, भारत सासणे, प्रकाश देशपांडे, बब्रुवान रुद्रकंठवार यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. कार्यक्रमास अधिकाधिक संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन नंदकिशोर कागलीवाल, अजित दळवी व डॉ. सुनील देशपांडे यांनी केले आहे.