शेती महामंडळाच्या खंडकरी शेतक-यांच्या जमीनवाटपात गैरप्रकार होणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे. जर कुणी अधिकारी किंवा कर्मचारी गैरप्रकार करीत असेल तर तशा तक्रारी कराव्यात, त्याची दखल घेतली जाईल, असे प्रतिपादन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
टिळकनगर मळय़ावरील ४ हजार ५०० एकर जमिनीचे वाटप करण्यात आले. त्याच्या सातबाराच्या उताऱ्याचे वाटप महसूलमंत्री थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी खंडकरी नेते माजी आमदार माधवराव गायकवाड हे होते. या वेळी आमदार भाऊसाहेब कांबळे, माजी आमदार जयंत ससाणे, जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार दयाल, बाजार समितीचे सभापती दीपक पटारे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन गुजर, अण्णासाहेब थोरात हे उपस्थित होते.
थोरात म्हणाले, जमीनवाटपात आपल्याजवळचे काही अधिकारी घोटाळे घालत आहेत असे आरोप करण्यात आले. या आरोपात तथ्य असेल तर जमीनवाटप तातडीने थांबवून घोटाळय़ाची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल. शेतक-यांच्या तक्रारी असतील तर निवेदन द्या, कानात सांगा, मात्र विषारी प्रचार करू नका अशी विनंती त्यांनी केली. थोरात यांनी माध्यमांवरही टीका करून जमीनवाटपात घोटाळा झालेला नसताना विनाकारण बातम्या दिल्या जातात त्यामुळे मनाला दु:ख होते. आता विष पेरण्याचे काम पत्रकारांनीही थांबवावे, असे त्यांनी स्पष्ट केले. आकारी पडीत जमीनमालकांचा प्रश्न प्रलंबित आहे. कायद्याच्या चाकोरीत हा प्रश्न मार्गी लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आचारसंहिता लागण्यापूर्वी या प्रश्नाला गती दिली जाईल, उर्वरित राहिलेले जमीनवाटप लवकरच पूर्ण केली जाईल असे थोरात म्हणाले.
ससाणे म्हणाले, खंडकरी चळवळीत सर्वच राजकीय पक्षांचा सहभाग आहे. जमीनवाटपात काही चुकीच्या लोकांनी खोडा घालण्याचा प्रयत्न केला, पण त्यावर मात करून खंडक-यांना मिळवून देण्यात यश मिळविले. गायकवाड, आमदार कांबळे आदींची या वेळी भाषणे झाली. सचिन गुजर यांनी सूत्रसंचालन केले.
संग्रहित लेख, दिनांक 6th Feb 2014 रोजी प्रकाशित
‘खंडकरी जमीन वाटप विशेष दक्षता’
शेती महामंडळाच्या खंडकरी शेतक-यांच्या जमीनवाटपात गैरप्रकार होणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे.

First published on: 06-02-2014 at 02:55 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Particularity in sharecropper land allocation