विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांनी कान उपटताच खडबडून जागे झालेल्या ठाण्यातील उपप्रादेशिक परिवहन विभागाने सोमवारपासून घोडबंदर ते ठाणे रेल्वे स्थानक या मार्गावर सुरू असणाऱ्या अवैध वाहतुकीच्या खासगी मार्गाची नाकेबंदी सुरू केली खरी, मात्र प्रशासनाची ही धडाकेबाज मोहीम प्रवाशांच्याच मुळावर उठल्याचे चित्र दिवसभर पाहावयास मिळाले.
ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाचा नाकार्तेपणा, रिक्षाचालकांची मुजोरशाही यामुळे रेल्वे स्थानक-घोडबंदर मार्गावरील हजारो प्रवासी दररोज या ‘अवैध’ वाहतुकीचा मार्ग पत्करतात. एरवी या बेकायदा वाहतुकीकडे कानाडोळा करणारे परिवहन विभागाचे अधिकारी डावखरेंच्या आदेशामुळे अचानक रस्त्यावर उतरले आणि ही सेवाच बंद पाडण्यात आली. त्यामुळे सोयीचा असणारा हा एकमेव मार्गही बंद पडल्याने रेल्वे स्थानक ते घोडबंदर असा प्रवास करणारे हजारो प्रवासी या कारवाईविरोधात दिवसभर अक्षरश: खडे फोडताना दिसत होते. अवैध वाहतूक थांबवा, मात्र त्यापूर्वी आम्हाला पर्यायी मार्ग तरी उपलब्ध करून द्या, असा सूरही प्रवाशांमधून उमटत होता. विशेष म्हणजे, खासगी बसचालकांच्या मुसक्या आवळणाऱ्या परिवहन विभागाने राजकीय नेत्यांच्या छत्रछायेत वावरणाऱ्या रिक्षाचालकांच्या मुजोरपणाकडे मात्र डोळेझाक सुरूच ठेवल्याने जादा भाडे, नकार पचवीत प्रवास करण्याशिवाय घोडबंदरवासीयांपुढे पर्यायच उरला नाही.
घोडबंदर मार्गावरील नागरी वसाहतींमध्ये जाण्यास रिक्षाचालक नकार देतात आणि ‘टीएमटी’च्या अपुऱ्या सेवेमुळे बस थांब्यांवर ताटकळत राहण्याऐवजी या मार्गावरील बहुतांश प्रवासी खासगी अवैध असलेल्या बससेवेचा आधार घेतात. सतत होणाऱ्या फेऱ्या, उत्तम सुविधा आणि प्रवाशांच्या सोयीचे व्यवस्थापन यामुळे या बेकायदा बससेवेला प्रवाशांची चांगली पसंती आहे. ठाण्यातील घोडबंदर परिसराची लोकसंख्या एव्हाना काही लाखांच्या पुढे गेली आहे. त्यामुळे या मार्गावर ही बेकायदा प्रवासी बससेवा भलतीच ‘लोकप्रिय’ आहे. या मार्गावर दररोज सुमारे ४० ते ५० खासगी बसेसमधून सुमारे २० हजार प्रवासी ये-जा करत असतात.
घोडबंदर मार्गावरील कासारवडवली ते माजिवडा २५ रुपये आणि माजिवडा ते रेल्वे स्थानक २० रुपये असे भाडे या बसचालकांकडून प्रवाशांना आकारले जाते. रिक्षातून स्थानकाकडे जाण्यासाठी प्रवाशांना ३५ ते ४० रुपये मोजावे लागतात. शिवाय भाडे नाकारण्याची रिक्षाचालकांची मुजोरी कायम असते. याउलट खासगी बसमधून प्रवास केल्यास प्रवाशांना कमी खर्च येतो, शिवाय कुठेही हात दाखविल्यास या बस थांबत असल्याने प्रवाशांची या अवैध वाहतुकीला एक प्रकारे मान्यता आहे.
अवैध वाहतुकीचे अतिक्रमण
घोडबंदर मार्गावर वर्षांनुवर्षे ही वाहतूक सुरू आहे. उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी मध्येच कधी
तरी या बसेसवर कारवाई करतात. एरवी मात्र कुणाचेही
याकडे लक्ष नसते. ठाणे रेल्वे स्थानकाचा पूर्व परिसर अतिशय निमुळता असूनही या भागात सकाळ-सायंकाळ अवैध
बसेसचे मोठय़ा प्रमाणावर अतिक्रमण झालेले पाहावयास मिळते. या अतिक्रमणामुळे गर्दीच्या वेळेत पूर्व भागात ये-जा करणे अशक्य होऊन बसल्याचे चित्र आहे. तरीही पोलीस अथवा परिवहन विभागाचे अधिकारी त्याकडे कानाडोळा करतात. वर्षांनुवर्षे होणाऱ्या खासगी बसेसच्या या अतिक्रमणाविषयी इतके दिवस ठाण्यातील सर्वच राजकीय पक्षांनी बघ्याची भूमिका घेतली होती. विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांना मात्र गेल्या आठवडय़ात अचानक जाग आली आणि त्यांनी यासंबंधी एक विशेष
बैठक घेऊन हे अतिक्रमण थांबविण्याचे आदेश संबंधित विभागांना दिले.
अतिक्रमण थांबले.. गैरसोय वाढली
साक्षात डावखरेसाहेबांचे आदेश असल्यामुळे खडबडून जागे झालेल्या परिवहन विभागाने सोमवारी घोडबंदर
मार्गावरून पूर्र्वेकडे येणारी ही बससेवा बंद पाडल्याने रेल्वे स्थानक परिसरात होणारे अतिक्रमण थांबले असले तरी प्रवाशांची मात्र गैरसोय होऊ लागली आहे. या अवैध वाहतुकीवर कारवाई होत असताना रिक्षा भाडे नाकारणाऱ्या चालकांच्या मुसक्या आवळण्यासाठी मात्र वाहतूक
विभागाने काहीही केलेले नाही. त्यामुळे मुजोर रिक्षाचालकांशी हुज्जत घालत कसेबसे स्थानक गाठावे लागल्याने प्रवाशी आदेशबाज नेते आणि पोलिसांविरोधात खडे फोडताना
दिसत होते.
प्रवाशांच्या सोयीसाठी नव्या बसेस विकत घेणार असल्याचे आश्वासन ‘टीएमटी’चे व्यवस्थापक देवीदास टेकाळे यांनी डावखरे यांनी घेतलेल्या बैठकीत दिले आहे. नव्या बसेस येतील तेव्हा येतील, मात्र फेऱ्या वाढविण्यासाठी सद्य:स्थितीत ‘टीएमटी’ काय करत आहे, असा सवाल संतप्त प्रवासी उपस्थित करत आहेत.