सिडकोच्या वतीने शहरात बांधण्यात आलेल्या बैठय़ा घरांच्या असोसिएशनकडे रहिवाशांकडून जमा होणारे मासिक शुल्क अत्यंत कमी असल्याने त्यांच्या विभागातील नागरी कामे करण्यात यावीत, या निर्णयाचा गैरफायदा घेऊन पालिकेने शहरातील सिडको आणि खासगी इमारतीतील परिसरातदेखील पेव्हर ब्लॉक लावण्याची करोडो रुपयांची कामे केली असल्याचे उघडकीस आले आहे.
विद्यमान आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांनी या नियमबाह्य़ कामांना संमती देण्यास स्पष्ट नकार दिलेला असताना प्रभाग समितीचे अधिकार वापरून अशी करोडो रुपयांची कामे आजही केली जात आहेत. त्यामुळे नवी मुंबईत पेव्हर ब्लॉकचा सुमारे १०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे स्पष्ट होत आहे. नवी मुंबईत सिडकोने एक लाख २३ हजार घरे बांधली आहेत. यात आर्थिकदृष्टय़ा दुर्बळ, अल्प, मध्यम आणि उच्च उत्पन्न गटातील रहिवाशांचा समावेश आहे. सिडकोचे कार्यक्षेत्र पनवेल, उरण तालुक्यात असले तरी नवी मुंबई पालिका क्षेत्रातील या घरांची संख्या सर्वाधिक ७५ टक्के आहे. आर्थिकदृष्टय़ा दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटातील रहिवाशांनी ही बैठी घरे पै-पैसा जमा करून किंवा हडकोचे कर्ज घेऊन खरेदी केलेली असल्याने त्यांचा दुरुस्ती खर्च अत्यंत कमी म्हणजे मासिक ५० रुपयांच्या वर नाही. त्यासाठी त्यांच्या असोसिएशन स्थापन करण्यात आल्या असून, या असोसिएशनच्या वतीने हा मासिक दुरुस्ती खर्च वसूल केला जातो. त्यातील शेकडो रहिवासी हा मासिक दुरुस्ती खर्च भरताना दिसत नाही. त्यामुळे या विभागात नागरी कामांचा अभाव असल्याचे दिसून येत होते. याच काळात पािलकेने या विभागात कोटय़वधी रुपयांचे मल:निसारण व जलवाहिन्या टाकण्याचे काम केल्याने विभागात मोठय़ा प्रमाणात खोदकाम झाले होते. कफल्लक असणाऱ्या असोसिएशन हे लाखो रुपये खर्चाचे दुरुस्ती काम करू शकत नसल्याने पालिकेने ते काम करण्यास सुरुवात केली. जून १९९९ च्या सुमारास सुरू झालेल्या या विभागातील कामात मोठय़ा प्रमाणात पेव्हर ब्लॉक लावण्यात आले. पाच ते दहा लाख रुपये खर्चाच्या या कामात नगरसेवकांचे चांगभलं होऊ लागले होते. त्यामुळे त्यांचा या कामात मोठा आग्रह असल्याचे दिसून येऊ लागले. जलवाहिन्या व मलवाहिन्या टाकलेल्या मार्गात किंवा येण्या-जाण्याच्या मार्गावर हे पेव्हर काम करण्याऐवजी पालिकेने राजकीय दबावापोटी असोसिएशनचे सर्व विभाग पेव्हरमय करून टाकले. त्यासाठी हजारो झाडांची कत्तल करण्यात आली आहे. या कामांवर करोडो रुपये खर्च होऊ लागल्याने कॅगने त्यावर ताशेरे मारले. खासगी असोसिएशनमध्ये पालिका अशी कामे कशी करू शकते, असा आक्षेप कॅगने घेतला. त्यामुळे ही कामे काही वर्षांसाठी थांबविण्यात आली. त्यानंतर पालिकेच्या आयुक्तपदी आलेले डॉ. पी. एस. मिना यांनी अशी कामे करण्यास हरकत काय, असा सवाल उपस्थित करून तसा पालिकेचा प्रस्ताव मंजूर करून घेतला. मिना यांची यामागे गरिबांना नागरी सुविधांचा फायदा व्हावा, अशी लोकहितार्थ भूमिका होती, पण त्याचा नंतर जो गैरफायदा घेण्यात आला आहे तो थक्क करणारा असून, आले नगरसेवकाच्या मना याप्रमाणे नजर जाईल त्या सोसायटीत पेव्हर ब्लॉकची कामे करण्यात आली असल्याचे दिसून येत आहे. हे करण्यामागे नगरसेवकांनी आपली व्होट बँक मजबूत केली असून, त्या निमित्ताने खिशेदेखील गरम करून घेतलेले आहेत. व्होट बँक नसलेल्या इमारती टाळण्यात आलेल्या आहेत. अनेक नगरसेवकांनी ही कामे स्वत:च्या बांधकाम कंपनीद्वारे केलेली आहेत. नवी मुंबईतील शेकडो खासगी व सिडको सोसायटीत अशी कामे करण्यात आली असून त्या कामांचा धुमधडाका आजही सुरू आहे. ज्या सोसायटीतील रहिवाशांची दुरुस्ती खर्च भरण्याची चांगलीच ऐपत आहे. त्या सोसायटीतही केवळ नगरसेवकांच्या आग्रहाखातर ही कामे करण्यात आलेली आहेत. सोसायटीत पेव्हर ब्लॉक बसविण्याचे हे काम प्रभाग समितीच्या माध्यमातून मंजूर होऊन प्रशासनाकडे केवळ उपायुक्तांच्या मंजुरीसाठी जात आहे. त्यामुळे राजकीय दबावापुढे दबलेल्या उपायुक्तांच्या टेबलावर पेव्हर ब्लॉकची फाइल आपटून ही कामे करून घेणाऱ्या नगरसेवकांची संख्या जास्त आहे. गरीब रहिवाशांच्या असोसिएशनपर्यंत मर्यादित असणारी ही कामे खासगी व सिडकोच्या सोसायटीच्या आवारात दिसू लागल्याने आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांनी अशा नियमबाह्य़ कामांना सहमती देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे उपायुक्तांना दमबाजी, शिवीगाळ करून ही कामे पदरात पाडून घेण्याचा प्रकार आजही सुरू आहे. शहरात फुटपाथ, चौक आणि सोसायटीत असे सर्वत्र केवळ पेव्हर ब्लॉक दिसू लागल्याने पावसाचे पाणी जमिनीत झिरपण्याच्या जागा नष्ट झालेल्या आहेत. त्यामुळे पर्यावरणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून, नवी मुंबईत इतर शहरांच्या तुलनेत उष्णतेचे प्रमाण वाढले आहे. पेव्हरचा वापर लक्षात घेऊन अनेक उद्योजकांनी काही अधिकाऱ्यांच्या सहकार्याने पेव्हर ब्लॉकच्या कंपन्या टाकलेल्या आहेत. मागील १४ वर्षांत नवी मुंबईत सुमारे १०० कोटी रुपये खर्चाचे केवळ पेव्हर ब्लॉक लावण्यात आल्याचे एका अभियंत्याने सांगितले. त्यामुळे म्हातारी मेल्याचे दु:ख नाही, काळ सोकावतोय, अशी व्यथा या अभियंत्याने व्यक्त केली.