मुंबईतील पायाभूत सुविधा प्रकल्पाच्या नशिबात ‘विलंब’ लिहिलेलाच असतो. पण पेडर रोड उड्डाणपुलाच्या प्रकल्पाचे नशीब जरा जास्तच वाईट दिसते. जवळपास दशकभरानंतर जुलै २०११ मध्ये या प्रकल्पाच्या पर्यावरण परवानगीसाठी सुनावणी झाली..आता फक्त मंजुरीचा आदेशच बाकी असे चित्र निर्माण झाले..परंतु तब्बल दोन वर्षांचा काळ उलटला तरी या प्रकल्पासाठीचा पर्यावरण परवानगीचा आदेश दिल्लीहून आलेला नाही. त्यामुळे गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या राज्य रस्ते विकास महामंडळाने उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी सुरू केलेली निविदा प्रक्रियाही थंडय़ा बस्त्यात पडली असून औपचारिक परवानगीअभावी उड्डाणपुलाच्या कामाचे उड्डाण थांबले आहे. पेडर रोडच्या उच्चभ्रू रहिवाशांनी आपला प्रभाव वापरत औपचारिक आदेश रोखून धरल्याची ‘एमएसआरडीसी’त चर्चा आहे.
दक्षिण मुंबई ते पश्चिम उपनगरांदरम्यानची वाहतूक पेडर रोडवर (गोपाळराव देशमुख मार्ग) येऊन अडखळते. हजारो वाहनांच्या गर्दीमुळे या रस्त्यावर बहुतांश वेळा वाहनांच्या रांगा असतात. वाहतुकीची ही कोंडी सोडवण्यासाठी मुंबईत इतरत्र ज्याप्रमाणे उड्डाणपूल बांधले, त्याच धर्तीवर पेडर रोडवर तब्बल ४.२ किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल बांधण्याचे ठरवण्यात आले. पण नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्ने..प्रकल्पाच्या घोषणेनंतरच त्यावरून वाद झाला. रहिवाशांनी विरोध केल्याने प्रकरण थंडावले. नंतर नानाविध अडचणींमधून वाट काढत अखेर जुलै २०११ मध्ये या प्रकल्पासाठी पर्यावरण सुनावणी झाली. त्यात पेडर रोडच्या उच्चभ्रूंची हुल्लडबाजी मुंबईकरांना पाहायला मिळाली. सुनावणीनंतर बराच काळ लोटला. मधल्या काळात केंद्रीय पर्यावरण खात्याच्या बैठकीत या प्रकल्पाला मंजुरीचा निर्णय झाला व डिसेंबर २०१२ मध्ये त्या बैठकीचे इतिवृत्त झळकले..आता केवळ अधिकृत आदेश आला की काम सुरू अशा थाटात ‘एमएसआरडीसी’ने बांधकामासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली. उत्कृष्ट सल्लागारामार्फत हे काम मार्गी लावणार, असे जाहीर केले. पण इतिवृत्त झळकून सात महिने व पर्यावरणाची सुनावणी होऊन दोन वर्षे उलटले तरी उड्डाणपुलाचे काम सुरू होऊ शकलेले नाही.
पेडर रोड उड्डाणपुलाच्या प्रकल्पाला आता काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस वादाचीही किनार आली आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या ‘किनारपट्टी रस्ता’ या लाडक्या प्रकल्पात या उड्डाणपुलाच्या ऐवजी भुयारी रस्ता बांधण्याचे प्रस्तावित आहे. पेडर रोडचे रहिवासीही त्यासाठी आग्रही आहेत. पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या अखत्यारितील सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) खात्याच्या अंतर्गत येणाऱ्या ‘एमएसआरडीसी’चा आग्रह उड्डाणपुलासाठी आहे. त्यामुळे पेडर रोड उड्डाणपूल बांधण्याचे राष्ट्रवादीच्या नेत्यांचे मनसुबे अद्याप प्रत्यक्षात येऊ शकलेले नाहीत.
नियोजित पेडर रोड प्रकल्प
* हाजीअली येथील लाला लजपतराय महाविद्यालय ते गिरगाव चौपाटीसमोरील
    विल्सन महाविद्यालय दरम्यान ४.२ किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल.
* रस्त्यावरील रस्ता या पद्धतीने सध्याच्या पेडर रोडवर उड्डाणपूल बांधला जाणार.
    काम सुरू झाल्यापासून दीड वर्षांत प्रकल्प पूर्ण होण्याचा दावा. प्रत्यक्षात जवळपास
    तीन वर्षे तरी जातील असा अंदाज.
*  उड्डाणपुलामुळे या टप्प्यातील वाहतुकीचा वेग सध्याच्या सरासरी १० ते १५ किलोमीटर
    प्रति तासवरून वाढून सरासरी ४० किलोमीटर प्रति तास इतका होईल. त्यामुळे इंधन,
    वेळाची मोठी बचत होईल.
*  पेडर रोडवरील उच्चभ्रू रहिवाशांच्या विरोधामुळे दशकाहून अधिक काळ
    कागदावरच रखडलेला पूल. आरंभी प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर व आशा भोसले
    यांनीही विरोध केला. पण वादंग उठल्यावर उड्डाणपूल प्रकरणावर तोंडावर बोट.
* आधीच्या नियोजनात या उड्डाणपुलासाठी केम्प्स कॉर्नर येथील मुंबईतील पहिला
    उड्डाणपूल पाडण्यात येणार होता. नंतर आराखडा बदलला केम्प्स कॉर्नरचा उड्डाणपूल
    कायम ठेवत पेडर रोडवर उड्डाणपूल बांधण्याचे नियोजन.
खर्चात वाढ
साडे तीन वर्षांपूर्वी पेडर रोड उड्डाणपूल प्रकल्पाचा खर्च २०० कोटी रुपये अपेक्षित होता. मधल्या काळात तो ३२० कोटी रुपयांपर्यंत गेला. म्हणजेच प्रकल्पाच्या खर्चात तब्बल १२० कोटी रुपयांची (६० टक्के) वाढ झाली. डिसेंबर २०१२ च्या अंदाजानुसार काम सुरू होऊन संपेपर्यंत प्रकल्पाच्या खर्चात आणखी १०० ते १५० कोटी रुपयांची वाढ होऊन तो सुमारे ४०० ते ४५० कोटी रुपये असणार होता. आता त्यासही सात महिने उलटून गेले. त्यामुळे प्रकल्प कागदावरच आणि खर्चाचा आकडा मात्र मारुतीच्या शेपटीप्रमाणे वाढतच चालला असे विचित्र समीकरण निर्माण झाले आहे.