* जिल्हाधिकाऱ्यांच्या नोंदणीच्या आवाहनाला हरताळ
* मतदार संख्या वाढवण्यासाठी नुसत्याच मोहिमा
निवडणूक आयोगाकडून मतदारांची संख्या वाढवण्यासाठी वेगवेगळ्या मोहिमा आखल्या जात असताना येथील जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात नुकतेच केलेले आवाहन फोल ठरल्याचे चित्र शहरात सर्वत्र आहे. यामुळे प्रशासनाने केलेल्या या आवाहनाला प्रतिसाद देऊन मतदान केंद्रे गाठणाऱ्या नागरिकांना, तसेच तरुणाईला नाहक हेलपाटे मारावे लागत असल्याचे गेल्या तीन दिवसांत दिसून आले आहे.
आगामी लोकसभा व विधानसभेची निवडणूक लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने सध्या देशभर नवीन मतदारांच्या नोंदणीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. याशिवाय महाविद्यालयातील तरुणांनी नोंदणी करावी, यासाठी विद्यापीठांनाही कामाला लावण्यात आले आहे. आयोगाच्या या निर्णयाची या जिल्ह्य़ातही अंमलबजावणी सुरू झाल्याचे जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसकर यांनी दोन दिवसांपूर्वी माध्यमांसमोर जाहीर केले. नवीन मतदारांच्या नोंदणीसोबतच ज्यांना मतदार यादीतील नावात बदल करायचा आहे, निवासी पत्ता बदलवायचा आहे किंवा आणखी काही सुधारणा करायची आहे, अशा नागरिकांनी त्यांनी या आधीच्या निवडणुकीत मतदान केलेल्या केंद्रावर जाऊन माहिती सादर करावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केले. प्रत्येक मतदान केंद्रावर जो कर्मचारी हजर राहणार आहे त्याचा मोबाइल क्रमांकही जाहीर करण्यात आला.
या आवाहनाला प्रतिसाद देणाऱ्या नागरिकांना मात्र प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र सर्वत्र आहे. येथील माजी नगरसेवक माखिजा वरोरा नाका चौकात असलेल्या एका महाविद्यालयात आपल्या मुलाच्या नावाची नोंदणी करण्यासाठी गेले. या महाविद्यालयात या कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याने त्यांना सहकार्य करण्यास चक्क नकार दिला. जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले असले तरी जोवर प्राचार्य निर्देश देणार नाहीत तोवर हे काम करणार नाही, अशी भाषा या कर्मचाऱ्याने वापरली. कर्मचारी सहकार्य करत नाही, हे बघून माखिजा यांनी तहसीलदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी बैठकीत व्यस्त असल्याचे सांगून बोलण्याचे टाळले. याच महाविद्यालयात काही तरुणी नव्याने नोंदणी करून घेण्यासाठी आलेल्या होत्या. त्यांनाही या कर्मचाऱ्याने नमुना अर्ज देण्यास नकार दिला. येथील औष्णिक वीज केंद्रातील दीपक बुजाडे यांना शहरातील धर्मराव प्राथमिक शाळेत हाच अनुभव आला.
येथे जिल्हा प्रशासनाने महानगरपालिकेतील एका कर्मचाऱ्याची नियुक्ती केली आहे. हा कर्मचारी शाळेत हजरच नव्हता. त्याच्याशी संपर्क साधला असता माझ्याकडे स्थानिक करवसुलीचे काम असल्याने सध्या तरी मतदार नोंदणीच्या कामाला वेळ देता येणार नाही, असे उत्तर या कर्मचाऱ्याने दिले. नंतर बुजाडे यांनी तहसील कार्यालयात धाव घेतली. तेथे एकही कर्मचारी बुजाडे यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी तयार नव्हता. हे काम करण्यासाठी आमच्याजवळ वेळ नाही, असे उत्तर या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी दिले.
यानंतर प्रस्तुत प्रतिनिधीने जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या यादीतील काही मतदान केंद्रांना भेटी दिल्या असता, तेथे या नोंदणीच्या कामासाठी नियुक्त केलेले कर्मचारी हजरच नसल्याचे आढळून आले. यापैकी काही कर्मचाऱ्यांना विचारले असता ही मोहीम जानेवारीपर्यंत चालणार आहे. नागरिक उगीच घाई करतात, असे विचित्र उत्तर मिळाले. फेरनिरीक्षणाच्या कामांच्या संदर्भात जबाबदारी देण्यात आलेले कर्मचारी येणाऱ्या नागरिकांना हाकलून देत असल्याच्या तक्रारीही आल्या आहेत. मतदार नोंदणीचे काम राष्ट्रीय कर्तव्यात मोडत असताना येथे मात्र या कर्तव्यालाच हरताळ फासला जात असल्याचे व त्याचा त्रास नागरिकांना होत असल्याचे दिसून आले आहे.