कोल्हापूर येथे चौदा महिन्याच्या बालिकेवर परप्रांतीय तरूणाने केलेल्या बलात्काराच्या निषेधार्थ व या प्रकरणातील आरोपी राजेशसिंग बबलेसिंग याच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी शुक्रवारी वडगाव शहरामध्ये बंद पाळण्यात आला. या बंदमध्ये व्यापारी, व्यावसायिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.     
परप्रांतीय तरूणाने केलेल्या बलात्कार प्रकरणाचे पडसाद जिल्ह्य़ात अनेक ठिकाणी उमटत आहेत. या घटनेबद्दल तीव्र संताप केला जात आहे. हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव येथे शुक्रवारी शिवसेनेने शहर बंदची हाक दिली होती. या बंदला शहरातील सर्व स्तरातून पाठिंबा मिळाला. नगरपालिकेजवळच्या चौकातील दुकाने बंद राहिल्याने बाजारपेठेत शुकशुकाट जाणवत होता. शिवसेनेचे शहरप्रमुख संदीप पाटील यांनी वडगाव पोलीस ठाण्याला निवेदन सादर केले. परप्रांतीयांची माहिती संकलित करावी व आरोपीवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. या वेळी सुनील माने, शंकर सुतार, उमेश पाटील,सुधीर साळुंखे, अनिल पाटील, हैदर कोळेकर, योगराज रसाळ, अनिल माने, अभिजित रसाळ यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.दरम्यान, जिल्ह्य़ामध्ये जमावबंदी आदेश असल्याने सहायक पोलीस निरीक्षक संजीव पाटील यांनी बंदला आक्षेप घेऊन शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना नोटिसा बजाविल्या. शहरात बंदोबस्तात वाढ करण्यात आली होती. अनुचित प्रकार न घडता बंद शांततेत पार पडला.