फुले, आंबेडकर विचारधारेत समग्र वैश्विकतेचे सामाजिक तत्त्वज्ञान निर्माण करण्याची क्षमता आहे. डॉ. गेल यांनी ही विश्वात्मकता जोपासावी, असे मत पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख ज्येष्ठ विचारवंत डॉ. यशवंत सुमंत यांनी व्यक्त केले.
सातारच्या संबोधी प्रतिष्ठानतर्फे पंधरावा ‘मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार’ डॉ. गेल ऑम्वेट यांना डॉ. यशवंत सुमंत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राचार्य अण्णासाहेब होवाळे, उपाध्यक्ष दिनकर झिंब्रे, कार्यवाह प्रा. रमेश जाधव, हौसेराव धुमाळ, डॉ. गेल ऑम्वेट यांच्या सासू ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक इंदूताई पाटणकर, पती श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर, परिवर्तनाच्या चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते संजीव साने (ठाणे), क्रांतिपर्व दिनदर्शिकेचे निर्माते आर. आर. पाटील (पुणे) आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. सुमंत म्हणाले, की आज फार मोठा समाजविचार विश्वापासून तुटत असताना डॉ. गेल ऑम्वेट व एलिनार झेनियट यांसारख्या दोन अमेरिकन विदुषींनी भारतात येऊन फुले, आंबेडकर चळवळीचे मूलभूत संशोधन ते समाजासमोर मांडून एक आदर्श निर्माण केला आहे. डॉ. गेल ऑम्वेट यांनी आपली ज्ञानसाधना पणाला लावून कठोर शिस्तीच्या संशोधन लेखनाने समतावादाचा आशय संपन्न केला. फुले, आंबेडकर यांना अभिप्रेत क्रियाशील विश्वात्मकता स्वीकारून त्यांनी संकल्पपूर्वक देशांतर करून शोषणमुक्तीसाठी कूट जातीच्या प्रश्नाला हात घातला आहे.
एकविसाव्या शतकाचे पहिले दशक ओलांडताना उत्तर आधुनिक भांडवलशाहीने निर्माण केलेल्या व्यवस्थापन आणि शोषणाच्या अरिष्टामध्ये आज आपण सापडलो आहोत. उत्पादनतंत्र व अर्थकारणाचे स्वरूप बदलतेय. या पेचावर मात केल्याशिवाय पुढचा टप्पा गाठता येणार नाही. नेशन स्टेट अस्थिर व कालबाह्य कम्युनल होत असून, जात, धर्म, भाषांच्या संकुचित निष्ठा प्रबळ होत आहेत. भांडवलाचे केंद्रीकरण व श्रमशक्तीचे विकेंद्रीकरण होत आहे. ही चिंतेची बाब आहे. सामाजिक, राजकीय परिवर्तनातील महत्त्वाचा घटक असलेला कामगार, किसानांचे विघटन होत आहे. त्यांची पुनर्बाधणी कशी करता येईल, तसेच समग्र वैश्विकतेचे नवे सिद्धान्त विकसित करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. जात मुक्त होत नाही तोपर्यंत सिव्हिल सोसायटी खऱ्या अर्थाने प्रतिबिंबित होणार नाही.
सत्काराला उत्तर देताना डॉ. गेल ऑम्वेट म्हणाल्या, की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मातोश्री भीमाबाई यांच्या नावाने पुरस्कार मिळाला याचा फार मोठा आनंद झाला. जात ही भारतीय समाजाचा फार मोठा दोष असून, ही वस्तुस्थिती आहे. भारतात स्त्रियांवर वाढत असलेल्या अत्याचाराबाबत त्यांनी खंत व्यक्त केली. समता व बंधुता हा बाबासाहेबांचा मुख्य हेतू लक्षात घेऊन समाजाचे वर्तन झाले पाहिजे असे डॉ. गेल ऑम्वेट म्हणाल्या.
डॉ. भारत पाटणकर यांच्या भगिनी ज्योतीताई निकम ज्येष्ठ अभ्यासक किशोर बेडकिहाळ, कवी प्रमोद कोपर्डे, डॉ. वैशाली चव्हाण, डॉ. गीतांजली पोळ, डॉ. शिवाजीराव पाटील, संबोधी प्रतिष्ठानचे प्रा. प्रशांत साळवे, उत्तमराव पोळ, कृष्णनाथ लादे, केशवराव कदम, रमेश इंजे, विजय गायकवाड,  विलासराव कांबळे यांच्यासह नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.