म्हारळ येथील जमिनीबाबतचा वाद
रिजन्सी निर्माण लिमिटेड कंपनीच्या विरोधातील दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सर्वोच्च न्यायालयानेसुद्धा रद्दबातल केली. या निर्णयामुळे म्हारळ गावातील जमिनीच्या वादाचा तिढा आता सुटला असून तेथे गृहसंकुल उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती रिजन्सी निर्माण कंपनीतील अधिकृत सूत्रांनी दिली.
म्हारळ येथील स्थानिक रहिवासी अनंता सखाराम म्हात्रे यांनी रिजन्सी या गृहनिर्माण कंपनीच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यामध्ये म्हारळ येथील गृहप्रकल्पाच्या जमिनीवर त्यांनी मालकी हक्क असल्याचा दावा केला होता. या प्रकरणात उच्च न्यायालयाने रिजन्सी कंपनीच्या बाजूने निकाल दिला होता. या निर्णयाविरोधात म्हात्रे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, सर्वोच्च न्यायालयानेही उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत रिजन्सी कंपनीच्या बाजूने निकाल दिला. रिजन्सी कंपनीच्या बाजूने निकाल लागल्यामुळे उत्साहित झालेल्या काही सदस्यांनी यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना आमच्या गृहप्रकल्पाला कटकारस्थान करून लक्ष्य करण्यात आल्याचे सांगितले. असे कारस्थान रचणाऱ्यांविरोधात आता कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे कंपनीच्या सूत्रांनी सांगितले. म्हारळ येथील जमिनीची कंपनीने कायदेशीर पडताळणी तसेच सर्व कायदेशीर अटींचे पालन करून खरेदी केली आहे. सदरहू जमीन सामुदायिक शेती संस्था यांच्याकडून खरेदी केली आहे. या संदर्भात, काही व्यक्ती खोटी कागदपत्रे सादर करून त्याआधारे जमिनीचा वाद निर्माण करीत आहेत, असेही सूत्रांनी सांगितले.