टिनावर ठेवलेली शेगडी काढण्यासाठी वर चढलेल्या एका व्यक्तीचा टिनात उतरलेल्या वीज प्रवाहामुळे मृत्यू झाल्याची दुदैवी घटना येथील वैजीनाथ नगरमध्ये आज सकाळी घडली. विजय नथ्थू गवई असे या व्यक्तीचे नाव असून तो प्लंबिंगचा व्यवसाय करीत होता. वैजीनाथ नगरमधील गणपती मंदिराजवळ प्लंबर विजय गवई (३५) आपल्या परिवारासोबत राहतात. आज सकाळी ते भुशाची शेगडी काढण्यासाठी टिनावर चढले. भिंतीला चिटकून त्यांच्या घराला वीज पुरवठा करणारी वायर होती. याला टिनांचा सतत स्पर्श झाल्यामुळे ती मधून तुटली आणि संपूर्ण टिनांमध्ये विद्युत प्रवाह सुरू होता, मात्र याबाबतीत विजय गवई अनभिज्ञ होते. टिनावर चढल्याबरोबर ते फेकल्या गेले आणि जखमी होऊन जमिनीवर पडले. त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात आणल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मृत विजय गवई यांच्या पश्चात पत्नी कल्पना, मोठी मुलगी राणी (६) आणि कोमल (३) असा परिवार आहे. प्लंबिंगच्या कामामुळे ते अनेकांना परिचीत होते. त्यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे त्यांच्या मृत्यूनंतर परिसरात शोक व्यक्त होत आहे.