एरवी बेदरकार वागणुकीमुळे आणि पीडितांबद्दलच्या सहानुभूतीशून्य दृष्टिकोनामुळे पोलिसांबाबत समाजात दुरावा वाढत असताना या समजाला सुखद धक्का देणारी घटना बदलापुरात घडली. निराधार मुलींच्या निवासी केंद्रात काही तरुण घुसल्याचा दूरध्वनी एका पोलीस अधिकाऱ्याला मिळताच मध्यरात्रीची वेळ असूनही अवघ्या पाच-सात मिनिटांत पोलिसांची कुमक मदतीसाठी पोहोचलीच; शिवाय रात्रभर गस्त घालत पोलिसांनी ‘सद्रक्षणाय’ हे ब्रीदवाक्य अगदीच खोटे नाही याची प्रचिती दिली.
मध्यरात्रीची वेळ होती. निराधार मुलींच्या बदलापुरातील एका निवासी केंद्राच्या आवारात काही तरुण घुसले.. दरवाजे-खिडक्या बंद असल्याने बंगल्यात शिरता आले नाही, पण त्यांना खिडक्यांमधून पाहताच मुली घाबरल्या. आतील महिला कर्मचाऱ्यांचीही पाचावर धारण बसली. पोलीस ठाण्यात फोन लावला गेला, पण तो लागत नव्हता. अखेर या कर्मचाऱ्यांनी आपल्या एका सहकारी महिलेला झाला प्रकार कळवला. तिने इंटरनेटवर शोधाशोध केली तर पोलीस निरीक्षक एस. के. मोहिते यांचा मोबाइल क्रमांक सापडला. त्यांना फोन लावला. उचलतील की नाही अशी धाकधूक होतीच. पण त्यांनी फोन उचलला. सारा प्रकार समजताच ‘तुम्ही काळजी करू नका, मी पाहतो’ असा धीर दिला. अवघ्या पाच-सात मिनिटांत पोलीस उपनिरीक्षक सालगुडे यांच्यासह हेडकॉन्स्टेबल घाडगे, खोडके त्या केंद्रात पोहोचले. या साऱ्यांनी केवळ उपचार म्हणून पाहणी न करता संबंधित तरुण कुठून आत शिरले असावेत याची शोधाशोध सुरू केली. संरक्षक भिंतीच्या त्या कच्च्या दुव्यांचा शोध लावला. कर्मचाऱ्यांशी बोलून त्या समाजकंटकांचे वर्णन विचारले. त्यानंतर पुढच्या वीस मिनिटांत परिसरात फिरत असलेल्या त्या वर्णनाशी मिळत्याजुळत्या तरुणांना ताब्यात घेतले.
इतके करून न थांबता नंतर रात्रभर पोलिसांची जीप परिसरात गस्त घालत होती. पोलिसांविषयी ना ना समज असलेल्या त्या मुलींना आपल्या मदतीसाठी पोलीसदादा धावून आल्याचा अनुभव फारच दिलासा देणारा आणि आश्वस्त करणारा ठरला.
संग्रहित लेख, दिनांक 8th Apr 2014 रोजी प्रकाशित
..आणि निराधार मुलींच्या मदतीला पोलीस धावले
एरवी बेदरकार वागणुकीमुळे आणि पीडितांबद्दलच्या सहानुभूतीशून्य दृष्टिकोनामुळे पोलिसांबाबत समाजात दुरावा वाढत असताना या समजाला सुखद धक्का देणारी घटना बदलापुरात घडली.
First published on: 08-04-2014 at 01:05 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police help defenceless girl