मुलींच्या छेडछाडीसंदर्भात निनावी माहिती भ्रमणध्वनीद्वारे दिली, तरी त्याची दखल घेऊन संबंधित समाजकंटकाला अटक करून त्याची भररस्त्यावरून धिंड काढली जाईल, असा इशारा टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रभाकर शिंदे यांनी दिला आहे.
नवी दिल्लीतील धावत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार झालेल्या मुलीचा अखेर मृत्यू झाल्याच्या पाश्र्वभूमीवर माढा तालुक्यातील मोडनिंब येथे महिला बचत गट, उमा कन्या विद्यालय, महाडिक महाविद्यालयाच्या वतीने मूकमोर्चा काढण्यात आला. त्या वेळी आयोजित सभेत पोलीस निरीक्षक शिंदे यांनी मुलींच्या छेडछाडीबाबत संवेदनशीलता दाखवीत संबंधित समाजकंटकांना कोणताही मुलाहिजा न ठेवता कठोर कारवाई करण्याची ग्वाही दिली. या वेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ.निशिगंधा माळी यांच्यासह माढा तालुका पंचायत समितीचे सभापती रणजितसिंह शिंदे आदी उपस्थित होते.
महिला बचत गटाच्या शर्मिष्ठा कोळी यांनी या मूकमोच्र्याचा हेतू विशद करताना मोडनिंब येथे शालेय व महाविद्यालयीन मुलींना समाजकंटकांकडून होणाऱ्या छेडछाडीकडे पोलीस यंत्रणेचे लक्ष वेधले. जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. निशिगंधा माळी यांनी रोडरोमियोंकडून भर रस्त्यावर मुलींची छेडछाड होत असल्याबद्दल संताप व्यक्त केला. मुलींनीही निर्भय होऊन अशा सडकसख्याहरींविरोधात पोलिसात तक्रारी दाखल करण्याचे धैर्य दाखवावे, त्यांच्या पाठीशी संपूर्ण समाजाने ताकद द्यावी, असे आवाहन डॉ. माळी यांनी केले.