दुष्काळग्रस्त भागात गुन्ह्य़ांचे प्रमाण वाढू नये म्हणून विशेष पोलीस महानिरीक्षक रितेशकुमार यांनी विशेष अभियान सुरू केले आहे. औरंगाबाद परिक्षेत्रातील ४ जिल्ह्य़ांमध्ये ४३३जणांवर तडीपारीची कारवाई प्रस्तावित आहे, तर दरोडा व मोक्का कायद्यान्वये दाखल २६ प्रकरणांत १४६जणांना अटक करण्यात आली. अजूनही ५६ आरोपी फरारी आहेत. या गुन्ह्य़ांपैकी २३ प्रकरणांमध्ये दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
दुष्काळग्रस्त भागात पिण्याच्या पाण्यामुळे समस्या निर्माण होऊ शकते, असे लक्षात आल्यानंतर ५७३ गावांवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांची नियुक्ती करण्यात आली. घरफोडय़ा, चोरी, दरोडे असे गुन्हे घडू नयेत, म्हणून पोलीस अधीक्षकांना सूचना दिल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांत पाण्यामुळे कायदा-सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होईल, असे कधी घडले नव्हते. मात्र, यंदा तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्य़ात २० दिवसांपूर्वी पाण्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. काही ठिकाणी अधिक टँकरने पाणीपुरवठा करण्याची गरज आहे. तशी माहिती प्रशासनाला दिली जाते. एकाच ठिकाणी पाण्याचे वाटप न करता वेगवेगळ्या विभागात ते केले जावे, अशीही सूचना पोलिसांनी महसूल प्रशासनाला केली आहे. जेथे अधिक समस्या, तेथे जास्त टँकर द्यावेत असेही कळविण्यात आले. त्याप्रमाणे अंमलबजावणी होत असल्याने अजून तरी मोठी अडचण जाणवली नाही, असे रितेशकुमार यांनी सांगितले. दुष्काळी स्थितीत पोलिसांनी अधिक संवेदनशील कसे वागावे, याचेही प्रशिक्षण दिले जात आहे. केवळ गुन्हेगारांना पकडणे हे एकमेव पोलिसांचे काम नसून लोकप्रतिनिधी व गावकऱ्यांशी सुसंवाद साधून पाण्याच्या स्थितीचे अवलोकन केले जात आहे.