लोकसभा निवडणुकीत आघाडीचे उमेदवार संजीव नाईक यांचा दारुण पराजय झाल्यानंतर जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सिडकोचे अध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांना भेटणाऱ्या माजी खासदार संजीव नाईक व आमदार संदीप नाईक यांच्या या भेटीची विरोधकांनी चांगलीच खिल्ली उडवली असून नाईक कुटुंबीयांची ही तर राजकीय नौटंकी असल्याचा आरोप केला आहे. नाईक बंधूनी सोमवारी सिडकोचे अध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांची भेट घेऊन २२ मागण्यांचे एक निवेदन दिले. त्यामुळे काँग्रेस व शिवसेना या नवी मुंबईतील राष्ट्रवादीच्या दोन प्रमुख विरोधकांच्या हाती आयतेच कोलीत मिळाले आहे.
लोकसभा निवडणुकीत ठाणे लोकसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार संजीव नाईक यांना दोन लाख ८१ हजार मतांनी पराजय स्वीकारावा लागला. देशात मोदी व सत्ताधाऱ्यांच्या विरोधात असलेली नाराजी बडय़ा दिग्गजांना भोवली आहे, पण ठाणे लोकसभा मतदारसंघात नाईक यांचा पराभव त्यांचे बालेकिल्ले भुईसपाट करणारा आहे. त्यामुळे खासदारकी गेली यापेक्षा दोन आमदारकी व पालिका वाचविण्याची चिंता नाईक यांना लागली आहे. येत्या काळात हा डॅमेज कंट्रोल करण्यासाठी नाईक यांनी भविष्यात अनेक कार्यक्रमांची आखणी केली आहे. त्यातील एक भाग म्हणून सिडकोकडे प्रलंबित असणाऱ्या मागण्यांचा पाठपुरावा करण्याचे ठरविण्यात आले असून त्याची जबाबदारी माजी खासदार व आमदार संदीप नाईक यांच्यावर सोपविण्यात आली आहे. या दोन बंधूनी सोमवारी सिडकोचे अध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांची भेट घेऊन एक निवेदन दिले. यात शहरात मोडकळीस आलेल्या इमारतींना अडीच एफएसआय त्वरित देण्यात यावा व प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरे कायम करण्याची मागणी करणारा तसेच झोपडपट्टीवाल्यांना चार एफएसआय देण्याची मागणी करणारे महत्त्वाचे मुद्दे आहे. याशिवाय प्रकल्पग्रस्तांच्या संस्थांसाठी देण्यात येणारे भूखंड निविदा न काढता देण्यात यावेत, औरंगाबादप्रमाणे जमिनी फ्री होल्ड करण्यात यावी, घणसोली नोड विकसित करून पालिकेकडे हस्तांतरित करण्यात यावा, अशा महत्त्वाच्या मागण्यांचा अंतर्भाव असलेले सुमारे २२ विषय सोडविण्यासाठी सिडकोला विनंती करण्यात आली आहे. सिडकोने हे विषय लवकरात लवकर न सोडविल्यास सिडकोवर मोर्चा आणण्याचा इशारा देण्यात आला आहे. नाईक बंधूंच्या या निवेदनाची विरोधकांनी चांगलीच खिल्ली उडवली आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांनी तर या आंदोलनाला राजकीय नौटंकी म्हटले आहे.
गेली दहा वर्षे मंत्री, खासदार, आमदार, महापौर ही शहरातील महत्त्वाची शासकीय पदे या नाईक कुटुंबीयांकडे असताना त्यांनी हे विषय सोडविले नाहीत. ते आता मोर्चा, निवेदन देऊन सोडविण्याचा प्रयत्न करीत आहेत. हे सर्व हास्यास्पद असून नवी मुंबईतील जनता इतकी दुधखुळी राहिलेली नाही. लोकसभा निवडणुकीत त्यांना जागा दाखविण्यात आली असून आता विधानसभेत तिची पुनर्रावृत्ती होणार आहे. ज्यांनी गेली १४ वर्षे प्रश्न तसेच भिजत ठेवले ते आता हे प्रश्न कसे सोडवू शकतात, असा सवाल उपस्थित करून चौगुले यांनी नाईक यांना आव्हान दिले आहे. जनतेचे प्रश्न सोडविण्याची इतकीच इच्छा असेल तर नाईक पिता-पुत्रांनी राजीनामे देऊन लोकांसमोर जावे, पण ते हे करणार नाहीत. पायाखालची वाळू सरकल्याने आता या आंदोलनांची स्टंटबाजी सुरूकेल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नाईकांनी आपल्या पदाचा राजीनामा राज्यपालांकडे देऊन ही स्टंटबाजी करावी, असे माजी महापौर रमाकांत म्हात्रे यांनी सांगितले. काँग्रेसला विश्वासात न घेता नाईकांची काय दारुण स्थिती झाली ते निवडणुकीत दिसून आले आहे. अजूनही वेळ गेलेली नाही, असा अनाहूत सल्ला म्हात्रे यांनी दिला. म्हात्रे यांचे अतिशय जवळचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण निवडून आल्याने त्यांची सध्या कॉलर ताठ आहे. त्यांनी चव्हाण यांच्या अभिनंदनाचे होल्डिंगदेखील शहारात जागोजागी लावले आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 27th May 2014 रोजी प्रकाशित
..ही तर नाईकांची राजकीय नौटंकी, विरोधकांकडून खिल्ली
लोकसभा निवडणुकीत आघाडीचे उमेदवार संजीव नाईक यांचा दारुण पराजय झाल्यानंतर जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सिडकोचे अध्यक्ष प्रमोद हिंदुराव

First published on: 27-05-2014 at 07:11 IST
मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Politics in navi mumabi