शहरावर भीषण पाणी टंचाईचे संकट घोंघावत असताना अक्कलपाडा धरणातून ३६१ दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात आले खरे, तथापि, तथाकथित जम्बो कॅनॉलमधून पाणी सोडण्याच्या अट्टाहासाने शहरवासीयांची सहा महिने तहान भागवू शकेल इतके म्हणजे तब्बल २०० दशलक्ष घनफूट अक्षरश: वाया घालविण्यात आल्याची तोफ आ. अनिल गोटे यांनी डागली आहे. धुळेकरांना मूलभूत हक्कांपासून वंचित ठेवल्याच्या मुद्यावरून संबंधितांविरुद्ध पाण्याची नासाडी करणे, चुकीच्या पद्धतीने पाण्याचा मार्ग ठरविणे यावरून उच्च न्यायालयात फौजदारी याचिका दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. दुष्काळावर मात करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करणे आवश्यक असताना धुळ्यात पाण्यावरून राजकीय संघर्ष पेटला आहे. या संघर्षांत तहान भागविण्याची राजकीय धुरिणांची खरोखरच मानसिकता आहे की नाही, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
शहराची पाणी प्रश्नाची पाश्र्वभूमी आणि इतिहास पाहिल्यास २००१-०२ मध्ये सुमारे २९ दिवस सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून एक थेंबभर पाणी मिळाले नव्हते. त्यावेळी अनेक विरोध धुडकावून ज्या एक्स्प्रेस कॅनॉलची निर्मिती झाली, त्या कॅनॉलमधून नकाणे तलाव भरून घेण्यात आला होता. आवश्यक त्या ठिकाणी पॉलीथीन पेपर अंधरूण अपेक्षित पाणी वाहून आणण्यात आले होते, असा दावा करत आ. गोटे यांनी यंदा भीषण दुष्काळी स्थितीत अधिकाधिक पाणी वाया घालविण्यात आल्याचा आरोप केला आहे. साक्री तालुका पाणी बचाव संघर्ष समितीच्या विरोधाला राजकीय बळ वापरून धुळेकरांसाठी मालनगाव, जामखेली, लाटीपाडा या प्रकल्पांमधील आरक्षित पाणी वाहून आणण्यात आले. पाणी आणताना प्रथम नैसर्गिक उताराला प्राधान्य द्यावे, जमिनीत पाणी कमी जिरावे, यासाठी उपाययोजना करणे, कमी अंतराचे नदी-नाले, पाट यांचा वापर करावा, असे आ. गोटे यांना अपेक्षित होते. त्यामागे २००१-०२ मध्ये साकारलेल्या एक्स्प्रेस कॅनॉलच्या अनुभवाचा संदर्भ होता. पावसाळा संपताना म्हणजे जमिनीत ओल असतानाच शहरातील नकाणे तलाव भरून घेण्याची प्रक्रिया सुरू झाली असती तर जमिनीत पाणी जिरण्याचे प्रमाण अत्यल्प राहिले असते, याकडे गोटे यांनी लक्ष वेधले आहे.
आ. गोटे यांनी प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधीसमवेत एक्स्प्रेस कॅनॉलसह प्रवाहीत झालेल्या पाण्याच्या मार्गाची प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन माहिती दिली. वाहून आलेल्या पाण्याची ठिक-ठिकाणी कशी नासाडी झाली, कुठे-कुठे पाणी मोठय़ा प्रमाणात जिरले किंवा पाण्याचा प्रवाह गरज नसताना खूप दूरच्या अंतरावरून कसा वळविण्यात आला याची माहिती दिली. शासकीय अधिकारी सत्तारूढ पक्षाच्या, मंत्र्यांच्या दबावाखाली चुकीचे निर्णय घेत असल्याची तक्रार केली. जम्बो कॅनॉलमधून पाणी सोडल्यामुळे धुळेकरांसाठी राखून ठेवलेल्या पाण्याची नासाडी झाली आहे. पाण्याचे हे नुकसान कोणत्याही स्थितीत भरून निघणार नाही. राजकीय अट्टाहासापायी पाणी वाया घालविणाऱ्यांना जाब विचारू, असेही गोटे यांनी म्हटले आहे. दुष्काळाने नागरीक हैराण झाले असताना राजकीय पातळीवर वेगळ्याच नाटय़ास सुरूवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदाराच्या कार्यकाळात जम्बो कॅनॉलची निर्मिती करून एक्स्प्रेस कॅनॉलला शह दिला गेला होता. आता दोन्ही कॅनॉलपैकी कोणत्या कॅनॉलचा वापर करावा वा झाला, यावरून वाद उद्भवला आहे. या राजकीय साठमारीत पाण्याच्या बिकट समस्येचे संबंधितांना काही सोयरेसूतक नसल्याचे चित्र आहे.