वीज दरवाढ कमी करण्यासाठी अडीच महीने आंदोलन करणाऱ्या यंत्रमाग व्यावसायिकांनी वीज देयके भरण्यास स्पष्ट नकार दर्शविला असून दुसरीकडे या समस्येची तड लागण्यासाठी विलंब लागत असल्याने तिढा निर्माण झाला असतानाच ३८ दिवसांपासून येथील किडवाई रस्त्यावर सुरू असलेले या व्यावसायिकांचे चक्री उपोषण बुधवारपासून येथील जुन्या पॉवर हाऊससमोर सुरू करण्यात आले आहे.
सप्टेंबरपासून ही वीज दरवाढ झाली आहे. पूर्वी यंत्रमाग व्यवसायासाठी प्रती युनिट तीन रुपये सहा पैसे असा सरसकट दर होता. आता २७ अश्वशक्तीपर्यंतच्या वापरासाठी प्रती युनिट चार रुपये १८ पैसे आणि २७ अश्वशक्तीपेक्षा अधिक वापरासाठी हाच दर साडेपाच रुपये असा वाढविण्यात आला आहे.
या दरवाढीमुळे शहराचा आर्थिक कणा समजला जाणारा यंत्रमाग व्यवसाय देशोधडीला लागेल. कारखानदार व कामगार या दोन्ही घटकांची त्यामुळे उपासमार सुरू होईल अशी तक्रार करीत ही दरवाढ त्वरीत मागे घ्यावी,  प्रती युनिट एक रुपये ८० पैसे अशी दर आकारणी करावी, या व्यावसायिकांच्या मागण्या आहेत. त्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या पॉवरलूम कंझ्युमर्स असोसियशनतर्फे विविध पातळ्यांवर आंदोलन सुरू करण्यात आले आहे. महामार्गावर रास्ता रोको,अप्पर जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी कार्यालयासमोर धरणे, शहरात दुचाकी फेरी, या स्वरूपाची आंदोलने यापूर्वी करण्यात आली आहेत. याशिवाय गेल्या महिन्यात या व्यावसायिकांनी मालेगाव ते मुंबई अशी मोटारसायकल फेरी काढण्याचा निर्धार केला होता. पण ऐनवेळी मुख्यमंत्र्यांनी ठोस आश्वासन दिल्याने ही फेरी रद्द करण्यात आली होती. या आश्वासनाची पूर्ती होत नसल्याने ३८ दिवसांपासून येथील किडवाई रस्त्यावर चक्री उपोषण सुरू करण्यात आले आहे. गेल्या तीन महिन्यापांसून वाढीव दराची देयके भरण्यास या व्यावसायिकांनी नकार दिल्याने अशा थकबाकीदारांविरोधात महावितरण कंपनीने वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू केली. या कारवाईस व्यावसायिकांनी जोरदार विरोध दर्शविला. आंदोलनाची तड लागपर्यंत अशा स्वरूपाची कारवाई करू नये असा आग्रह धरण्यात आल्याने महावितरण कंपनीतर्फे वीज पुरवठा खंडित करण्याची सुरू झालेली कारवाई थांबविण्यात आली. परंतु आंदोलन सुरूच असल्याने तिढा निर्माण झाला आहे.
या आंदोलनाची शासन पातळीवर दखल घेतली जात नसल्याने व्यावासयिकांमध्ये नाराजीचा सूर असून आता हे चक्री उपोषण महावितरण कंपनीच्या येथील जून्या पॉवर हाऊससमोर सुरू करण्यात आले आहे. उपोषणात असोसियशनचे अध्यक्ष युसूफ इलियास,मौलाना जाहिद, शेख इब्राहिम, अब्दुल बाकी, शकील शाहिद, हजीर साहिर आदी सामिल झाले आहेत