लोहारा शहर व परिसराला मान्सूनपूर्व पावसाने चांगलेच झोडपले. बुधवारी दुपारी चारच्या सुमारास सुमारे पाऊण तास पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरले. तासभर वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट सुरू होता. वीज कोसळून दोन शेळ्या ठार झाल्या, तर एक जण गंभीर जखमी झाला.                ज्ञानेश्वर निर्मळे यांच्या शेतात झाडाच्या खाली उभ्या असलेल्या शेळ्यांवर वीज कोसळून दोन शेळ्या ठार झाल्या. शेजारीच थांबलेले दिनकर पिराजी रोडगे (वय ४२) विजेच्या ज्वाळा लागून गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुमारे तासभर सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे शहराच्या सखल भागात पाणी साचले. दिगंबर कांबळे, कल्याण कांबळे, शेषेराव िशदे, बाळू कांबळे, निशिकांत कांबळे यांच्या घरात पाणी घुसून अन्नधान्यासह संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले. वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांवरील पत्र्यांचेही नुकसान झाले. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठाही खंडित झाला होता.