भारतीय प्रशासकीय सेवांप्रमाणेच (युपीएससी) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेतही नागपुरात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा टक्का वाढला असून भारतीय प्रशासकीय सेवा पूर्वपरीक्षा प्रशिक्षण संस्थेच्या आठ विद्यार्थ्यांनी एमपीएससीमध्ये चमकदार कामगिरी करून विजयश्री खेचून आणली आहे. राज्यात भारतीय प्रशासकीय सेवेचे प्रशिक्षण देणाऱ्या मुंबई, नागपूर, कोल्हापूर आणि औरंगाबाद या शहरांमध्ये चार शासकीय संस्था आहेत. मुंबई पाठोपाठ नागरी सेवांमध्ये सर्वाधिक यशस्वी विद्यार्थी देणारी नागपूरची ही संस्था आहे. इतर शैक्षणिक संस्थांप्रमाणेच या संस्थेत दरवर्षी प्रवेश दिले जातात. एवढेच नव्हे, तर विद्यार्थ्यांना विद्यावेतनही दिले जाते. गेल्या काही वर्षांमध्ये संचालक डॉ. संगीता पकडे-यावले यांनी संस्थेचा कायापालट केला असून नागपूरसह लातूर, कोल्हापूर, अमरावती, गडचिरोली, सांगली आणि इतर जिल्ह्य़ातून विद्यार्थी या ठिकाणी येतात.
सुयोग अमृत नगरदेवळेकर, नितीन श्यामराव हिंगोले, प्रवीण निनावे, अश्विनी प्रभाकर बिजवे, तुषार करमरकर, प्रशांत उरकुडे, धीरज गोहाड आणि रवींद्र साधू होळी यांनी उपजिल्हाधिकारी, सहाय्यक विक्रीकर आयुक्त, मुख्याधिकारी वर्ग दोन, तहसीलदार आदी पदांसाठी यश संपादित केले आहे. मुळचा जळगाव जिल्ह्य़ातील भडगावचा सुयोग अमृत नगरदेवळेकर याची उपजिल्हाधिकारी म्हणून निवड झाली असून त्याचा १६ वा क्रमांक आहे. तो हाँगकॉँगमधील भारतीय स्टेट बँकेत सहाय्यक व्यवस्थापक आहे. नितीन हिंगोले नांदेडचा असून तो भोपाळ येथील नाबार्डमध्ये सहाय्यक व्यवस्थापक आहे. त्याचीही उपजिल्हाधिकारी म्हणून निवड झाली आहे. प्रवीण निनावे आणि अश्विनी बिजवे यांची सहाय्यक विक्रीकर आयुक्त म्हणून निवड झाली आहे. निवड नामावलीत प्रवीणचा सातवा क्रमांक असून तो बी.टेक. इंजिनिअर आहे. सध्या तो नागपुरातच विक्रीकर निरीक्षक आहे. अश्विनी १०३ क्रमांकावर आहे.
सहाय्यक विक्रीकर आयुक्त म्हणून निवड झालेली अश्विनी मुलींमध्ये नागपुरातून तिसऱ्या क्रमांवर आहे. डॉ. तुषार करमरकर, प्रशांत उरकुडे आणि धीरज गोहाड यांची मुख्याधिकारी वर्ग दोन या पदासाठी निवड झालेली आहे. नुकताच केंद्रीय लोकसेवा आयोगाचाही निकाल जाहीर झाला असून त्यात तुषारची राष्ट्रीय माहिती सेवेत युपीएससीतूनही निवड झालेली आहे. त्याने एमपीएससीतही उत्कृष्ट कामगिरी केली असून मुख्याधिकारी वर्ग दोनमधून तो महाराष्ट्रातून दुसऱ्या, तर प्रशांत १७ व्या क्रमांकावर आहे. तुषार कुहीमध्ये वैद्यकीय अधिकारी होता, तर एम.ए. केलेला प्रशांत सिंचन विभागात वरिष्ठ लिपीक पदावर जळगावात नोकरी करीत आहे. धीरजचा महाराष्ट्रातून २० वा क्रमांक असून मुळचा अमरावती जिल्ह्य़ातील वरूडच्या बेनोडा गावचा. धीरजच्या घरी शेती व्यवसाय आहे. सध्या धीरज नागपुरात विक्रीकर निरीक्षक आहे. गडचिरोलीच्या रवींद्र साधू होळी याने बीएएमएस पदवी संपादित केली असून तहसीलदार पदासाठी त्याची निवड झाली आहे. या पदासाठी त्याचा राज्यातून २९ वा क्रमांक आहे.
भारतीय प्रशासकीय सेवा पूर्वपरीक्षा प्रशिक्षण संस्थेच्या संचालक डॉ. संगीता पकडे-यावले म्हणाल्या, युपीएससी व एमपीएससी दोन्हींचा निकाल आणखी चांगला लागण्याची अपेक्षा होती. मात्र, तरीही दरवर्षीपेक्षा एमपीएससीचा उत्तीर्ण होण्याचा टक्का वाढला आहे. विद्यार्थ्यांनी अतिशय परिश्रमाने हे यश संपादित केले आहे.