लोकसभेच्या निवडणुका अद्याप वर्ष-सव्वा वर्ष लांब असल्या तरी विदर्भातील ‘हेवीवेट’ लढतीचा कयास आतापासून बांधला जात आहे. देवेंद्र फडणवीसांकडे प्रदेश भाजप अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आल्याने त्यांच्या तरुण नेतृत्त्वात विदर्भातील लोकसभा मतदारसंघात भाजपच्या संभाव्य विजेत्या उमेदवारांना नव्या राजकीय समीकरणांच्या आधारे तिकीट वाटप करून मोठा पल्ला गाठण्यासाठी विदर्भातील भाजप कार्यकर्त्यांना सूचक संदेश देण्यात आला आहे. राज ठाकरेंच्या झंझावाती दौऱ्याने मनसेत चैतन्य आले आहे. तर भाजपने अप्रत्यक्षपणे निवडणुकीचे रणशिंग फुंकले असून काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते आता सावध झाले आहेत.
भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी संसदेत प्रवेशण्यासाठी उत्सुक असल्याने नागपूर लोकसभा मतदारसंघातून अर्ज भरणार आहेत. राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी मिळाली तेव्हा गडकरी लोकसभा वा राज्यसभा सदस्य नव्हते. परंतु, दिल्लीत वट जमविण्यासाठी ‘खासदार’ होणे त्यांच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असून सर्वात मोठी लढत पुढील वर्षी नागपुरातच रंगण्याची अटकळ बांधली जात आहे. दिल्लीतील बडय़ा भाजप नेत्यांच्या बरोबरीत बसण्यासाठी नुसते विधान परिषद सदस्य राहून चालणारे नाही. त्यासाठी संसदीय अनुभव गरजेचा आहे, याची कल्पना राष्ट्रीय पातळीवर पक्षाचे नेतृत्त्व करताना गडकरींना आली आहे. त्यामुळेच त्यांनी लोकसभा लढण्याची जिद्द मनाशी बांधली आहे. दुसरीकडे प्रचंड अनुभवी काँग्रेस नेते व माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांनी खासदार जनसंपर्क अभियान रथ घासूनपुसून बाहेर काढल्याने त्यांची नागपुरातून पुन्हा एकदा लढण्याची खुमखुमी लपून राहिली नाही. परिणामी नागपूर लोकसभा मतदारसंघात गडकरी विरुद्ध मुत्तेमवार अशी ‘हेवीवेट’ लढत संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेणारी ठरेल, असेच चित्र सध्यातरी दिसून येते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय नागपुरात असल्याने गडकरींच्या पाठिशी संपूर्ण संघ परिवार एकदिलाने उभा राहील. ज्येष्ठ पुत्राच्या विवाहाचा बार उडवून देताना गडकरींनी नागपुरात लक्षभोजन आयोजित करून त्यांचा जनसंपर्क दांडगा असल्याचे दाखवून दिले होते. मात्र, याचे मतांमध्ये परिवर्तन होईल वा नाही, अशीही शंका व्यक्त केली जाते. रिपब्लिकन आणि ओबीसी मतदारांची संख्या पाहता गडकरींना पहिल्या लोकसभा विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार असल्याने सात निवडणुकांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या विलास मुत्तेमवारांशी टक्कर वाटते तेवढी सोपी नाही, याची जाणीव त्यांना आहे. मुत्तेमवारांविरोधात काँग्रेस पक्षातीलच एक विशिष्ट लॉबी काम करीत असल्याने त्यांच्या मदतीने काँग्रेसची मते फोडण्याचे राजकारण खेळले जाईल. परंतु, हे हवेतील मनोरे आहेत कारण निवडणुकीच्या वेळी काँग्रेसजन एकत्र येतात, ही वस्तुस्थिती आहे. ‘डमी’ उमेदवार उभे करून मतविभाजनाचा आणखी एक पर्याय खेळला जाण्याची शक्यता असल्याने ही निवडणूक प्रचंड ‘महागडी’ ठरेल, अशी अटकळ आहे.
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करीत असलेले राष्ट्रवादीचे प्रभावशाली नेते व उद्योगपती प्रफुल्ल पटेल यांच्या विरोधात लढणारा बलाढय़ उमेदवार भाजपजवळ नाही. परंतु, भंडारा-गोंदिया जिल्ह्य़ावर भक्कम पकड मिळवणारे विद्यमान आमदार नाना पटोले संभाव्य उमेदवार म्हणून आतापासूनच चर्चेत आहेत. पटेलांनी विदर्भासाठी काय केले, या मुद्दय़ावर त्यांना अडचणीत आणण्याचा एकही प्रयत्न भाजपने सोडलेला नाही. मात्र, उद्योगपतींशी लॉबीशी असलेले मधुर संबंध आणि केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयासारखे प्रबळ खाते असलेल्या प्रफुल्ल पटेलांनी भेलसारखा मोठा प्रकल्प खेचून आणला आहे. मिहान खेचण्यातही त्यांचा मोठा आहे. विदर्भाच्या औद्योगिक विकासातही त्यांचा मोठा वाटा आहे, त्यामुळे नाना पटोले स्थानिक मुद्दय़ांवर लढताना कितपत प्रभाव पाडतील, याचा अंदाज घेतला जात आहे. पटेलांना टक्कर देऊ शकेल अशा तुल्यबळ उमेदवारांच्या शोधात सध्यातरी नाना पटोलेंचे पारडे जड झालेले दिसते.
रामटेकचे विद्यमान काँग्रेस खासदार मुकुल वासनिक यांचे केंद्रातील मंत्रिपद काढून त्यांच्याकडे राष्ट्रीय पातळीवर पक्ष संघटनेची जबाबदारी सोपविण्यात आली असली तरी रामटेकमधून दुसऱ्यांदा निवडून येणे त्यांच्यासाठी सोपे नाही. रामटेकची जागा युतीच्या घटक पक्षात शिवसेनेच्या वाटय़ाला आली आहे. सुबोध मोहिते येथूनच शिवसेनेच्या तिकिटावर लढून केंद्रात मंत्री झाले होते. परंतु, मुकुल वासनिकांविरुद्धच्या लढतीत शिवसेनेजवळ बलवान उमेदवार नसल्याने काँग्रेसने पुन्हा एकवार या मतदारसंघावर कब्जा मिळविला. आता ही जागा खेचून आणण्यासाठी शिवसेनेने   आतापासूनच    मोर्चेबांधणी सुरू केली असून  तुल्यबळ   उमेदवारासाठी  चाचपणी केली जात आहे.
वध्र्यातून दत्ता मेघे यांनी नुकतेच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे आशीर्वाद घेतले. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने दत्ता मेघेंनी पवारांशी तुटलेले जुने संबंध पुन्हा पुनस्र्थापित केले. दत्ता मेघेंना आता पुत्राच्या राजकीय भविष्याचे वेध लागले असून सागर मेघे यांना वध्र्याच्या उमेदवारीसाठी पुढे करण्याचे त्यांचे मनसुबे लपून राहिलेले नाहीत. दत्ता मेघे जुन्या काँग्रेसचे प्रचंड अनुभवी नेते असून त्यांचे पुत्र सागर मेघे भाजपातून पुन्हा काँग्रेसमध्ये आले आहेत. याचे भांडवल करून वध्र्यातील प्रभा राव घराण्याच्या वारस चारुलता राव टोकस या मेघेंपुढे पक्षांतर्गत आव्हान उभे करण्याची शक्यता नाकारता येत नाही. मेघे आणि राव कुटुंबाचे राजकीय हाडवैर जगजाहीर आहे. दिवं. प्रभा रावांचे निकटचे नातेवाईक रणजित कांबळे यांच्याशीही मेघे गटाचे कधीच पटले नाही. त्यामुळे वर्धा मतदारसंघ मेघेंसाठी आता सोपा राहिलेला नाही.