आराध्य दैवत देवी महाकालीच्या यात्रेला येत्या १६ एप्रिल पासून सुरूवात होत आहे. यात्रेला थोडा अवधी शिल्लक असल्याने मंदिर परिसरात विविध कामांना सुरूवात झाली आहे. येथील देवी महाकाली मंदिरात १०० वर्षांच्या अधिक कालावधीपासून चैत्र महिन्यात यात्रा भरते. या यात्रेला नांदेड, उस्मानाबाद, कोल्हापूर, लातूर, परभणी, यवतमाळ, अकोला, अमरावती, वर्धा, याच बरोबर आंध प्रदेशातील करिमनगर, कागजनगर या ठिकाणाहुन मोठय़ा भक्तीभावाने भाविक येतात. कुणी नवस फेडायला तर कुणी दर्शनाला येतात. विदर्भातील आठ शक्तिपीठांपैकी एक शक्तीपीठ असल्याने या यात्रेला मोठे महत्व आहे. या यात्रेत सहभागी होण्यासाठी दूरवरून मोठय़ा संख्येत भाविक चंद्रपूरात दाखल होतात.
यात्रा काहीच दिवसांवर येऊन पोहचल्याने मंदिर व्यवस्थापनातर्फे विविध कामांना वेग आला आहे. यात्रेच्या कालावधीत भाविक मंदिर परिसरातच वास्तव्यास असतात. त्यासाठी भाविकांच्या राहण्याची, पिण्याच्या पाण्याची, अंघोळीची, शौचालय, दवाखाना आदीची व्यवस्था मंदिराकडुन करण्यात येणार आहे. मंदिरातर्फे बांधण्यात आलेल्या भक्त निवासात भक्तांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या निवासात एका वेळेला पाच हजार भाविक थांबू शकतात. या व्यतिरिक्त मंदिराला लागून असलेल्या पटांगणावर १८ हजार चौरस फुट तर बैल बाजार येथे १० हजार चौरस फुट मंडप उभारण्यात येणार आहे.
देवीचे दर्शन घेणे भाविकांना सहज सोपे व्हावे म्हणून भक्तगणांच्या रांगेसाठी अठरा हजार चौरस फुटाचा एक आणि दुसरा पाच हजार चौरस फुटाचा मंडप उभारण्यात येत आहे. तसेच सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन ठिकठिकाणी कॅमेरे व ध्वनीक्षेपक बसवण्यात येणार आहे. पोलिस विभागातर्फे एका पोलिस चौकिची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी मंदिर परिसरातील ५ हजार लिटरची क्षमता असलेल्या टाकित महानगरपालिकेकडुन पाणी घेण्यात येणार आहे. या पाण्याला थंड करून भाविकांपर्यत पोहोचवण्यात येणार आहे. तसेच परिसरात पाणपोई सुरू करण्यात येणार आहे. भाविकांसाठी चौविस तास दवाखान्याची सोयही करण्यात येणार आहे, झरपट नदी, गुरूमाऊली, येथे भाविकांच्या अघोळीची तर पटांगण, गौतम नगर येथे शौचालयाची व्यवस्था करण्यात येणार आहे.
येत्या १६ तारखेला घटस्थापना करण्यात येणार असून २४ एप्रिलच्या रात्री आणि २५ तारखेला सकाळी महापुजेचे आयोजन करण्यात आले आहे, या दोन्ही दिवशी भाविकांची गर्दी मोठय़ा प्रमाणात असते. या काळात मंदिर पुर्ण वेळ भाविकांसाठी खुले असते.
यात्रेदरम्यान नारळ फोडायला बंदी असल्याने भाविक २५ तारखेनंतर नारळ फोडुन आपआपल्या गावाकडे परतात व गर्दी कमी होऊ लागते. या यात्रेदरम्यान शहरातील विविध सामाजिक संघटना, प्रशासन मंदिराला मदत करते अशी माहिती गजानन महाराज यांनी दिली.
संग्रहित लेख, दिनांक 12th Apr 2013 रोजी प्रकाशित
महाकाली महायात्रेची जय्यत तयारी; १६ एप्रिलपासून भक्तांची मांदियाळी
आराध्य दैवत देवी महाकालीच्या यात्रेला येत्या १६ एप्रिल पासून सुरूवात होत आहे. यात्रेला थोडा अवधी शिल्लक असल्याने मंदिर परिसरात विविध कामांना सुरूवात झाली आहे. येथील देवी महाकाली मंदिरात १०० वर्षांच्या अधिक कालावधीपासून चैत्र महिन्यात यात्रा भरते.
First published on: 12-04-2013 at 04:14 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Preparation started for festival of mahakali