नागपुरातील नामांकित तुली हॉटेल समूहाचे मालक प्रिन्स तुली यांना शनिवारी सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला. मात्र, अटक टाळण्यासाठी दोन आठवडय़ात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेण्याची मुभा दिली आहे. प्रिन्स तुली यांची पत्नी व माजी विश्वसुंदरी युक्ता मुखी यांनी मुंबईच्या अंबोली पोलीस ठाण्यात गेल्या ३ जुलैला तुली कुटुंबाविरुद्ध मानसिक आणि शारीरिक छळाची तक्रार नोंदविली होती. यात तुली यांचे मातापिता आणि बहिणीवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सत्र न्यायालयाने तुली यांचे मातापिता आणि बहिणीला अटकपूर्व जामीन मंजूर केला. आपले अशील चौकशी संस्थेशी पूर्ण सहकार्य करतील, या अटीवरच त्यांना अटकपूर्व जामिनाचा मार्ग मोकळा झाला.
अंबोली पोलीस ठाण्यातील चौकशी अधिकारी मूळ नागपूरचा असल्याने तो तुली कुटुंबाची बाजू घेत असल्याची तक्रार युक्ता मुखीने केली आहे. याची दखल घेऊन न्यायालयाने सदर प्रकरणाची चौकशी बांद्रा पोलिसांकडे सुपूर्द केली. प्रिन्स तुली यांच्याजवळ आपल्या काही व्हीडिओ क्लिप्स असून त्या सार्वजनिक करण्याची भीती युक्ता मुखीने न्यायालयात व्यक्त केली आहे. तसेच एका वृत्तपत्राला मुलाखत देऊन आपली प्रतिमा कलंकित करण्याचा प्रयत्न प्रिन्स तुली यांनी केल्याचीही मुखीची तक्रार आहे. गेल्या १८ ऑगस्टच्या युक्ताच्या तक्रारीनंतर तुली विरुद्ध दुसरा एफआयआर दाखल करण्यात आला होता.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Sep 2013 रोजी प्रकाशित
प्रिन्स तुली यांना अटकपूर्व जामीन देण्यास नकार
नागपुरातील नामांकित तुली हॉटेल समूहाचे मालक प्रिन्स तुली यांना शनिवारी सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला.
First published on: 03-09-2013 at 09:06 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prince tulis anticipatory bail deny