शहरातील नागरिकांना भेडसावणारी तीव्र पाणीटंचाई लक्षात घेता अमोल हिरोळे यांनी त्यांच्या भूखंडावरील खासगी बोअर पिण्याच्या पाण्यासाठी खुला करून दिला. जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर यांच्या हस्ते शुक्रवारी या बोअरवेलचे लोकार्पण करण्यात आले.
या शहराला पाणी पुरवठा करणारे येळगाव धरण आटल्यावर शहराला पेनटाकळी धरणावरून पाणी पुरवठा सुरू झाला. हे पाणीसुध्दा २२ ते २५ दिवसानंतर एकदा मिळत असल्याने लोकांना पिण्याचे पाणी विकत घेऊन आपली गरज भागवावी लागत आहे. मात्र, ज्यांच्याकडे पाणी विकत घेण्याची क्षमता नाही, पाणी साठवून ठेवण्याची व्यवस्था नाही अशा नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते.
सध्या शहरातील पाण्याच्या टाकीजवळ नगर पालिकेने नळ लावून पाण्याची व्यवस्था केली आहे. मात्र, मे मधील वाढत्या उन्हामुळे व तीव्र पाणीटंचाईमुळे नागरिकांची पाण्याची गरज लक्षात घेता अमोल हिरोळे यांनी त्यांच्या एल.आय.सी. कार्यालयाजवळील भूखंडातील बोअर खुला करून दिला.
या ठिकाणी तीन पाण्याच्या टाक्यांना आठ नळाच्या तोटय़ा लावून हे पाणी नागरिकांना देण्यात येत आहे. या पाण्याच्या टाकींचे जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर यांच्या हस्ते फित कापून लोकार्पण करण्यात आले. यापूर्वी त्यांनी शहरात पाणपोई सुरू केली, तर दुष्काळग्रस्त निधीसाठी एक लाख रुपयाचा निधी पालकमंत्र्यांना महाराष्ट्र दिनी दिला.
यावेळी नगराध्यक्षा उज्वला काळवाघे, तहसीलदार दिनेश गिते, नगरसेवक दादाराव गायकवाड, सतीश मेहेंद्रे, विनोद बेंडवाल, प्रमिलाताई गवई, एल.आय.सी.चे शाखाधिकारी जोशी, खानझोडे, गवई उपस्थित होते. मे आणि जून महिन्यात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासणार आहे.
प्रशासनाकडून उपाययोजना सुरूच आहेत. मात्र, अशा टंचाईच्या काळात अमोल हिरोळे यांनी स्वत:हून घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. त्यांचा आदर्श घेऊन इतरांनीही पाणीटंचाई निवारणार्थ हातभार लावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कुरुंदकर यांनी यावेळी केले.
संग्रहित लेख, दिनांक 18th May 2013 रोजी प्रकाशित
टंचाईग्रस्त गावकऱ्यांसाठी खासगी कूपनलिका उपलब्ध
शहरातील नागरिकांना भेडसावणारी तीव्र पाणीटंचाई लक्षात घेता अमोल हिरोळे यांनी त्यांच्या भूखंडावरील खासगी बोअर पिण्याच्या पाण्यासाठी खुला करून दिला. जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर यांच्या हस्ते शुक्रवारी या बोअरवेलचे लोकार्पण करण्यात आले.
First published on: 18-05-2013 at 02:15 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Private borewell made available for water shortage affected villagers