जनसंघाचे नेते आणि माजी खासदार रामभाऊ म्हाळगी यांच्या एकतिसाव्या स्मृतिदिनानिमित्त मंगळवारी (५ जानेवारी) रामभाऊ म्हाळगीप्रेमींचा मेळावा आयोजित करण्यात आला असून माजी केंद्रीय मंत्री राम नाईक यांचे ‘म्हाळगी यांची राजकीय जीवनशैली’ या विषयावर या मेळाव्यात मुख्य भाषण होणार आहे.
वाडा संस्कृती अभियानतर्फे सरस्वती मंदिर शाळेच्या मैदानात (नातूबाग) मंगळवारी सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होईल. पक्षसंघटनेची बांधणी करताना रामभाऊ म्हाळगी यांनी वाडय़ावाडय़ातून बैठका घेऊन पक्षाचे अनेकविध कार्यक्रम सातत्याने केले होते. छोटय़ा छोटय़ा कार्यक्रमांमधून त्यांनी उभे केलेले मोठे संघटन, जिव्हाळा आणि त्यांची राजकीय कार्यशैली यांची ओळख नव्या पिढीला व्हावी, यासाठी या मेळाव्याचे आयोजन केल्याचे संघटनेचे अध्यक्ष दीपक रणधीर यांनी सांगितले.
मेळाव्यात राम नाईक, ज्येष्ठ विधिज्ञ दादासाहेब बेंद्रे, ज्येष्ठ पत्रकार, निवेदक डॉ. विश्वास मेहेंदळे, आमदार गिरीश बापट तसेच महापालिकेतील गटनेता अशोक येनपुरे, नगरसेवक दिलीप काळोखे यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून म्हाळगी यांचे सहकारी आणि अनेक ज्येष्ठ कार्यकर्तेही या वेळी उपस्थित राहणार आहेत.