ग्रामीण व शहरी भागातील लोकांमध्ये वाचन संस्कृती वाढावी या उद्देशाने राज्य शासनातर्फे प्रत्येक जिल्ह्य़ाच्या ठिकाणी ‘ग्रंथोत्सव-१३’ चे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी शासनाने ३५ लाख रुपये देण्याची तयारी दर्शवली आहे.
ग्रंथप्रेमींना एकाच ठिकाणी विविध ग्रंथ, साहित्य व वाड्:मयविषयक पुस्तके उपलब्ध व्हावी, तसेच प्रकाशक आणि ग्रंथ विक्रेत्यांना ग्रंथ विक्रीसाठी एकाच ठिकाणी आवश्यक ती सुविधा उपलब्ध व्हावी, हा ग्रंथ महोत्सव आयोजनामागचा हेतू आहे. महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक धोरण-२०१० अंतर्गत ‘ग्रंथोत्सव-२०१३’ हा उपक्रम राज्यातील ३३ जिल्ह्य़ांत राबवण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागामार्फत डिसेंबर २०१३ ते फेब्रुवारी २०१४ या कालावधीत हा उपक्रम राबवला जाणार आहे. या उपक्रमासाठी शासनाने ३५ लाख रुपये तरतूद केली आहे. हा निधी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांना दिला जाणार आहे.
यानंतर राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ प्रत्येक जिल्ह्य़ाच्या जिल्हा माहिती अधिकाऱ्यांना प्रत्येकी एक लाख रुपये देणार आहे. जिल्हा माहिती अधिकाऱ्यांना एक लाख रुपये खर्च करून हा महोत्सव साजरा करावा लागणार आहे. यामध्ये महोत्सवाचे उद्घाटन व अन्य कार्यक्रम करावे लागणार आहे. या खर्चाची संपूर्ण माहिती जिल्हा माहिती अधिकाऱ्यांना साहित्य व संस्कृती मंडळाला सादर करावी लागणार आहे. तीन महिन्यात राज्यातील संपूर्ण जिल्ह्य़ाच्या ठिकाणी ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यासाठी जिल्हा माहिती अधिकाऱ्यांना धावपळ करावी लागणार असल्याचे दिसते.