ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या शिक्षण क्षेत्रातील वाढते खासगीकरण, उदारीकरण व जागतिकीकरणाच्या धोरणामुळे शिक्षणाचे झालेले बाजारीकरण याच्या निषेधार्थ अखिल भारतीय शिक्षा अधिकार मंच व समविचारी संघटनेच्यावतीने आयोजिलेल्या शिक्षण संघर्ष यात्रेचे बुधवारी नाशिकमध्ये आगमन झाले. या विषयावर पालकांमध्ये प्रबोधन व्हावे यासाठी यात्रेच्या माध्यमातून पथनाट्य, मानवी साखळी आणि परिसंवादाद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. त्या अंतर्गत गुरूवारी शिक्षण जनसुनवाई होणार आहे.
सरकारने स्वीकारलेल्या खासगीकरण, उदारीकरण व जागतिकीकरणाच्या धोरणामुळे शिक्षण व्यवस्थेचे प्रचंड बाजारीकरण झाले असून घटनेने दिलेला समान व गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा मूलभूत अधिकार प्राप्त करणे सर्वसामान्यांना अवघड झाले आहे. या विरोधात जनजागृती करून सर्वसामान्यांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने अखिल भारतीय शिक्षा अधिकार मंचने सहकारी-समविचारी संस्था व संघटनांच्या सोबतीने देशभरात शिक्षण संघर्ष यात्रेचे आयोजन केले आहे. देशातील ईशान्य, दक्षिण, पश्चिम, पूर्व व उत्तर अशा पाच ठिकाणांवरून ही यात्रा निघाली आहे. या उपयात्रांपैकी पश्चिमेकडील प्रवाह नाशिक येथे बुधवारी दाखल झाला. पुढील टप्प्यात नाशिकसह उत्तर महाराष्ट्राचा परिसर यात्रा मार्गक्रमण करणार आहे. नाशिकरोड येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ नाशिकरांच्यावतीने संघर्ष यात्रेचे स्वागत शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले. शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या संघटनांचे पदाधिकारी यात्रेसमवेत विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे रवाना झाले. स्थानिक पातळीवरील शैक्षणिक प्रश्नांबाबतचे निवेदन संबंधितांना दिले जाणार होते. पाच दिवस आधी याबाबत कल्पना देऊनही उपसंचालकांच्या अनुपस्थितीमुळे कार्यालयीन कर्मचाऱ्यांकडे हे निवेदन देण्यात आले.
सेंट फ्रान्सिस स्कूलसमोर यात्रेतील सहकारी, मुंबई येथील अॅड. अनिषा कुलकर्णी आणि मंचचे पदाधिकारी यांनी मानवी साखळी करत मूक निदर्शने केली. बी. डी. भालेकर मैदानात शिक्षण संस्थाकडून शुल्क वाढीच्या माध्यमातून होणारी पालकांची आर्थिक लूट, शिक्षणाचे वाढते बाजारीकरण, पालकांना होणारा मनस्ताप या विषयावर पथनाटय़ सादर करण्यात आले. सायंकाळच्या सत्रात महापालिकेसमोर शिक्षण विभागाच्या कार्यशैली विरोधात निदर्शने करण्यात आली. भालेकर मैदानावर महापालिका आणि जिल्हा परिषद शाळांचे सक्षमीकरण, खासगी शाळांची वाढती नफेखोरी या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले.
गुरूवारी सकाळी शिक्षणावरील प्रश्नांवर जनसुनवाई होणार असून त्यानंतर रासबिहारी येथे पथनाटय़ सादर होईल अशी माहिती मंचचे पदाधिकारी प्रा. मिलींद वाघ यांनी दिली. यात्रेत अनेक समविचारी संघटनासह ज्ञान भारती, छात्रभारती संघटनेने सहभाग नोंदविला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 13th Nov 2014 रोजी प्रकाशित
पथनाटय़, मानवी साखळीद्वारे शैक्षणिक नफेखोरीविरुध्द पालकांकडून जागृती
ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या शिक्षण क्षेत्रातील वाढते खासगीकरण, उदारीकरण व जागतिकीकरणाच्या धोरणामुळे शिक्षणाचे झालेले बाजारीकरण याच्या निषेधार्थ अखिल भारतीय शिक्षा अधिकार मंच व समविचारी संघटनेच्यावतीने आयोजिलेल्या शिक्षण संघर्ष यात्रेचे बुधवारी नाशिकमध्ये आगमन झाले.
First published on: 13-11-2014 at 07:53 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Protest against commercialization in educational system