कामठी तालुक्यातील बिडबिना गावकऱ्यांना घरकूल उभारणीसाठी १५ मे पूर्वी तातडीने अनुदान द्यावे, अशी मागणी करीत तोपर्यंत अनुदान न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे.
कामठी तालुक्यातल्या कोराडी-महादुला जिल्हा परिषद क्षेत्रातील वारेगाव ग्रामपंचायतीत बिडबीना हे गाव येते. कन्हान नदीने या गावाला चारही बाजूने वेढले आहे. आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पाठपुराव्यानंतर शासनाने या गावाच्या पुनर्वसनासाठी ७० लाख रुपयांचा निधी मंजूर केला. पुनर्वसनाची आवश्यक ती कामे पूर्ण झाली असून उन्हाळादरम्यान पुनर्वसनाची प्रक्रिया पूर्ण होण्याच्या दृष्टीने गावातील ३८ कुटुंबीयांच्या घरकूल उभारणीसाठी आवश्यक अनुदान १५ मे पूर्वी द्यावे, अशी मागणी आमदार बावनकुळे
यांनी जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांना
भेटून केली. यासंबंधीचे निवेदनही सादर केले. १५ मे पर्यंत अनुदान न दिल्यास या गावकऱ्यांसह आंदोलन करण्याचा
इशारा दिला.
वारेगाव-सुरादेवी दरम्यानच्या सामाजिक न्याय खात्याच्या निवासी शाळेलगत जागेवर ७० लाख ५० हजार रुपये खर्चून जागेचे सपाटीकरण, पाणी पुरवठा, नाली, गटारे, विद्युतीकरण आदी नागरी सुविधांची कामे सार्वजनिक बांधकाम व इतर शासकीय खात्यांमार्फत पूर्ण करण्यात आली. आवश्यक नागरी सुविधांची कामे पूर्ण झाली असल्याने बिडबीना या पूरग्रस्त गावातील ३८ कुटुंब स्थलांतर करण्यास तयार आहेत. पण अत्यंत गरीब असल्याने त्यांना घरकूल उपलब्ध करून देणे शासनाची जबाबदारी आहे.
यासाठी या कुटुंबांना भूखंडांची मोजणी करून घरे बांधण्यासाठी घरकूल अनुदान
निधी १५ मे २०१४ पूर्वी दिला जावा.
त्यामुळे पावसाळ्यापूर्वी पुनर्वसन करता येईल, ही बाब आमदार बावनकुळे
यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली.