अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी शहाद्यासह काही ठिकाणी निदर्शने व मेणबत्ती फेरी काढण्यात आली. नाशिकमध्ये विविध संस्थांच्या वतीने निषेध सभाही घेण्यात आल्या. राज्य सरकार कायदा व सुव्यवस्था हाताळण्यात अपयशी ठरल्याचा आरोप अनेक जणांनी केला आहे.
छात्रभारती
छात्रभारतीचे सल्लागार डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावरील हल्ल्याचा नाशिक येथे छात्रभारतीच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला आहे. शहरातील व्ही. एन. नाईक महाविद्यालयात छात्रभारती शाखेतर्फे सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना काळ्या फिती बांधण्यात आल्या. निषेध सभाही घेण्यात आली. अ‍ॅड. प्रभाकर वायचळे, राकेश पवार, वैभव गुंजाळ या वेळी उपस्थित होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा नाशिक जिल्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला आहे. दाभोलकर हे ज्येष्ठ विचारवंत होते, असेही संघाने निवेदनात म्हटले आहे. संघ दाभोलकर कुटुंबीयांच्या दु:खात सामील असल्याचे  नाशिक शहर जिल्हा संघचालक विजय कदम यांनी नमूद केले आहे.
वावरे महाविद्यालय
सिडकोतील वावरे महाविद्यालयात डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या निषेधार्थ शोकसभा घेण्यात आली. या वेळी प्राचार्य डॉ. किशोर पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अंधश्रद्धा निर्मूूलनाचे कार्य गांधीवादी मार्गाने करणाऱ्या डॉ. दाभोलकर यांच्यावरील हल्ला म्हणजे समाजाच्या विवेकालाच आव्हान आहे. एखाद्या माणसाला संपवून त्याचे विचार संपविता येणार नाहीत. समाजातील अंधश्रद्धा आणि कर्मकांडाचा पगडा दूर करण्यासाठी दाभोलकरांनी महाराष्ट्रभर चळवळ उभी केली होती. शासनाने जादूटोणाविरोधी विधेयक मंजूर करावे हीच त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल असेही ते म्हणाले.
भीमशक्ती संघटनेतर्फे सभा
नाशिकरोड येते भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने माजी महापौर अशोक दिवे यांच्या अध्यक्षतेखाली निषेध सभा घेण्यात आली. अविनाश आहेर यांनी प्रास्ताविकात, दाभोलकरांचे विचार कधीही संपणार नाहीत, असे नमूद केले. दिवे यांनी दाभोलकर यांच्यासारख्या प्रामाणिक व्यक्तीवर हल्ला होणे ही बाब कायदा आणि सुव्यवस्था किती ढासळली आहे ते स्पष्ट होण्यासाठी पुरेसे ठरावे असे म्हटले. लक्ष्मण सोनवणे, अशोक अहिरे यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. जगदीश पवार यांनी सूत्रसंचालन केले.

शहाद्यात मेणबत्ती फेरी
शहादा येथे डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या निषेधार्थ मेणबत्ती फेरी काढण्यात आली. या फेरीत शहरातील नागरिकांनी मोठय़ा संख्येने सहभाग नोंदवत मारेकऱ्यांचा निषेध केला. विश्रामगृहापासून फेरीला सुरुवात झाली. नगराध्यक्ष करुणाबेन पाटील, डी. एच. पाटील, माजी नगराध्यक्ष अशोक बागूल, डॉ. कांतीलाल टाटिया, नगरसेवक प्रा. दत्ता वाघ आदी विविध संघटनांचे पदाधिकारी यांमध्ये सहभागी झाले.
जनता चौकात फेरीचे रूपांतर सभेत झाले. या वेळी प्राचार्य डॉ. विश्वास पाटील, ज्येष्ठ नागरिक संघाचे जे. डी. पाटील, डॉ. टाटीया यांनी श्रद्धांजली वाहिली. नरेंद्र अहिरे यांनी सूत्रसंचालन केले.