भारतीय हद्दीत घुसून भारतीय लष्कराच्या चौकीवर पाकिस्तानी लष्कराने केलेल्या हल्ल्याचे बुधवारी शहरासह जिल्ह्य़ात तीव्र पडसाद उमटले. विविध पक्ष व संघटनांनी पाकिस्तानचे प्रतीकात्मक पुतळे व पाकिस्तानचा ध्वज जाळला. शिवसेनेने शहरासह उपनगरांमध्येही अनेक ठिकाणी निषेध केला.
पाकिस्तानचे निषेध करतानाच या नापाक हल्ल्यात शहीद झालेल्या भारताच्या पाच जवानांना या वेळी आदरांजली वाहण्यात आली. माळीवाडा वेशीजवळ शिवसेनेने चौकसभेद्वारे पाकिस्तानबरोबरच केंद्रातील सत्ताधारी काँग्रेस आघाडी सरकारचाही निषेध केला. काँग्रेसच्या निष्क्रियतेमुळेच पाकिस्तान अशा भ्याड हल्ल्याद्वारे आगळीक करीत असल्याच्या भावना वक्त्यांनी व्यक्त केल्या. पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणीही या कार्यकर्त्यांनी केली. आमदार अनिल राठोड, शहरप्रमुख संभाजी कदम, माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक नितीन जगताप, गणेश कवडे, संजय शेंडगे, संतोष गेनाप्पा, अर्चना देवळालीकर, आशा निंबाळकर, सुषमा पडोळे आदी या आंदोलनात सहभागी झाले होते. शहरात दहा ते पंधरा ठिकाणी शिवसेनेने निषेध व्यक्त केला.
चितळे रोड भाजी विक्रेते व हातगाडी संघटनेनेही येथेच सकाळी साडेअकरा वाजता पाकिस्तानचा ध्वज जाळून या हल्ल्याचा निषेध केला. संघटनेचे अध्यक्ष संजय झिंजे व उबेद शेख यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात संघटनेच्या सदस्यांबरोबरच नागरिकही मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.
केडगाव परिसरातील भूषणनगर येथे शिवसेनेचे नगरसेवक दिलीप सातपुते यांच्या नेतत्वाखाली कार्यकर्त्यांनी पाकिस्तानच्या निषेधाच्या घोषणा देत त्यांचा ध्वज जाळला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने न्यू आर्टस महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर पाकिस्तानचा प्रतीकात्मक पुतळा जाळून निषेध व्यक्त केला.
कर्जतला निषेध
वंदे मातरम व भारत माता की जय अशा घोषणा देत कर्जत येथे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी या हल्ल्याचा निषेध केला. पाकिस्तानचा प्रतीकात्मक पुतळा या वेळी जाळण्यात आला. पक्षाचे तालुकाप्रमुख बळीराम यादव व युवासेनेचे तालुकाप्रमुख दीपक शहाणे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. अविनाश जाधव, आनिल यादव, अतुल कानडे, महावीर बोरा, मयूर सर्वे, भास्कर भैलुमे आदी या आंदोलनात सहभागी झाले होते.