पल्स पोलिओ लसीकरण मोहीम अंतर्गत १९ व्या वर्षी ४७३५० बालकांना १९ जानेवारी रोजी महापालिकेच्या क्षेत्रात पोलिओ डोस पाजण्यात येणार आहे. मोहिमेचे वैशिष्टय़ म्हणजे या दिवशी तीन वेळा भोंगा वाजवून पालकांना डोसचे स्मरण करून दिले जाणार आहे.     
यंदा महापालिकेच्यावतीने १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा कृती आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी सुरू आहे. शहरातील ए, बी, सी, डी, आणि ई या पाच वॉडार्ंमध्ये एकूण १७२ केंद्रांवरून लसीकरण करण्यात येणार आहे. सर्व जकात नाके, रेल्वे स्टेशन, एस.टी.स्टँन्डवर परगांवावरून येणाऱ्या बालकांना डोस पाजण्यासाठी बुथ स्थापित केले आहेत. शिवाय महालक्ष्मी मंदिर येथेही खास बूथ ठेवण्यात आला आहे. प्रत्येक लसीकरण केंद्रावर १ वैद्यकीय अधिकारी, १ परिचारिका,१ नोंदणी अधिकारी, १ मदतनीस-शिपाई-आया, ३ स्वयंसेवक इत्यादी कर्मचारी वर्ग तैनात करण्यात येणार आहे. शहरातील सर्व केंद्रांवर मिळून एकूण १२९ कर्मचारी वर्ग काम करणार आहे.     
या मोहिमेचे पालकांना स्मरण होण्यासाठी १९ जानेवारी रोजी सकाळी ८, ११ व दुपारी ४ वाजता छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना व महापालिकेच्या अग्निशमन केंद्रांमार्फत सायरन (भोंगा)वाजविण्यात येणार आहे.