महापालिका क्षेत्रात रविवारी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार असून, त्यात जवळपास दोन हजार अधिकारी व कर्मचारी सहभागी होणार आहेत. मोहिमेनंतर सलग पाच दिवस घरोघरी जाऊन सर्व बालकांनी डोस घेतला आहे की नाही याची खातरजमा केली जाणार आहे. राज्य शासनाच्या सूचनेवरून ही मोहीम राबविली जात असल्याचे महापालिकेने म्हटले आहे. तिचे उद्घाटन रविवारी महापौर अ‍ॅड. यतिन वाघ यांच्या हस्ते होईल. महापालिका क्षेत्रात मोहिमेसाठी तब्बल ५६५ बुथ, १०० तंबू ठोकून कार्यान्वित राहणारे पथक, ४४ फिरती पथके तसेच सात रात्री फिरणारी पथके अशी यंत्रणा उभारण्यात आली आहे. त्यासाठी एकूण १६७८ कर्मचारी, ११४ पर्यवेक्षक, प्रभाग अधिकारी म्हणून निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य़), पशुवैद्यकीय अधिकारी, जीवशास्त्रज्ञ, मुख्य वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या संख्येवरून मोहिमेचा आवाका लक्षात येईल. मोहिमेनंतर घरोघरी जाऊन मुलांना डोस दिल्याची खात्री केली जाईल. पाच दिवस ही कार्यवाही सुरू राहणार आहे. त्यासाठी ५२९ पथके व १०५ पर्यवेक्षक त्या कामाचे मूल्यमापन करतील. या सर्व कामांचा अखेरीस आढावा घेतला जाणार आहे. या मोहिमेत वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, सेविका, मदतनीस, वैद्यकीय महाविद्यालय, सामाजिक संस्था, रोटरी क्लब, जिल्हा मलेरिया विभाग आदींचे सहकार्य लाभणार आहे. नागरिकांनी या मोहिमेस सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त संजय खंदारे यांनी केले आहे.