सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत जिल्ह्य़ात, धरणांच्या आवर्तन काळात लाभधारक शेतकऱ्यांकडुन मारहाणीसारखे प्रकार घडू लागल्याने सरकारी अधिकारी, कर्मचारी अस्वस्थ झाले असुन त्यांनी कामबंदचा इशारा दिला आहे. यासंदर्भात पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांना निवेदन देऊन याकडे लक्ष वेधले आहे.
कनिष्ठ अभियंता तसेच अधिकारी, कर्मचारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी हे निवेदन दिले. पाटबंधारे विभागाच्या, श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा उपविभागातील उपअभियंता डी. आर. खोसे यांना शुक्रवारी कार्यालयात कोंडून मारहाण करण्यात आली. तसेच कार्यालयातील सरकारी मालमत्तेचे नुकसान करण्यात आले व उपअभियंत्यांना गोळ्या घालून ठार मारण्याची धमकीही देण्यात आली, यासंदर्भात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापुर्वीही राहुरी तालुक्यातील गुहा परिसरात प्रवरा उजवा तट कालवावरील वीज पुरवठा बंद करण्यास गेलेल्या पाटबंधारे अधिकाऱ्यांना शिवीगाळ करण्यात आली व वीज वितरण कंपनीच्या वायरमनला मारहाण करण्यात आली. अशा घटना निवेदनात नमूद करण्यात आल्या आहेत.
सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत लाभधारकांना एकाच वेळी आवर्तनाचे पाणी मिळावे, अशी अपेक्षा आहे. परंतु कालव्याची वहन क्षमता व इतर तांत्रिक बाबींमुळे ते शक्य होत नाही, अशावेळी लाभधारकांनी संयम बाळगणे आवश्यक आहे. परंतु तसे न होता, पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घालणे, कार्यालयात कोंडणे, असे प्रकार होत आहतेच यंदा मात्र अधिकाऱ्यांना मारहाण करण्यापर्यंत मजल गेली आहे. अशा घटनांमुळे पाटबंधारे खात्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची काम करण्याची मानसिकता राहिली नाही, त्यांच्यामध्ये भिती व असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे, याची पुनरावृत्ती झाल्यास अधिकारी व कर्मचाऱ्यांना कामबंद आंदोलन करावे लागेल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.