जिल्हय़ाच्या राजकीय वर्तुळात बहुचर्चित व लक्षवेधी ठरलेल्या सिरसाळा गणात भाजपचा उमेदवार १ हजार ४०० मतांनी विजयी झाला असताना १६ महिन्यांनंतर झालेल्या पोटनिवडणुकीत मात्र २०० मतांनी भाजपला पराभव पत्करावा लागला. खासदार गोपीनाथ मुंडे यांना एकगठ्ठा मते देणाऱ्या गावातही आमदार धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीला मतांची आघाडी मिळवून दिली. त्यामुळे पहिल्यांदाच खासदार मुंडेंच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीचा चंचुप्रवेश झाला.
बीड जिल्हा, त्यात परळी तालुका खासदार मुंडे यांचा मागील ४० वर्षांपासून एकहाती राजकीय बालेकिल्ला राहिला. दीड वर्षांपूर्वी जि. प. निवडणुकीच्या तोंडावर खासदार मुंडेंचे पुतणे आमदार धनंजय मुंडे यांनी बंड करून राष्ट्रवादीशी घरोबा केला. ज्येष्ठ बंधू पंडितराव मुंडे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. या पाश्र्वभूमीवर झालेल्या जि. प. निवडणुकीत मात्र खासदार मुंडे यांनी आमदार मुंडे यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा दारुण पराभव करून तालुक्यातील जि. प. व पं. स.च्या सर्व जागा मोठय़ा मताधिक्याने जिंकल्या. राष्ट्रवादीकडून उभे असलेल्या पंडितराव मुंडे यांचाही सिरसाळा गटात मोठय़ा मताधिक्याने पराभव झाला. सिरसाळा गणात भाजप उमेदवाराने १ हजार ४०० मतांनी विजय मिळवला. या पराभवामुळे आमदार मुंडे यांच्या राजकीय निर्णयावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले.
सिरसाळा गणातील भाजप उमेदवाराचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर २३ जूनला येथे पोटनिवडणूक झाली. भाजपने मृत सदस्याची पत्नी सय्यद अनिमुनिसा निसार यांना उमेदवारी देऊन सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला, तर जिल्हाभरातील पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची फौज तैनात करून आमदार पंकजा पालवे यांच्या खांद्यावर निवडणुकीची जबाबदारी टाकली. आमदार मुंडे यांनी बाजार समिती उपसभापती बाबासाहेब काळे यांना राष्ट्रवादीची उमेदवारी दिली. मुंडे कुटुंबातील आमदार बहीण-भाऊ यांनी तळ ठोकून आपल्या उमेदवारीसाठी प्रतिष्ठा पणाला लावली. अखेरीस धनंजय मुंडे यांनी ही जागा खेचून घेतली.
राजकीय बंडानंतर तालुक्याच्या राजकारणात प्रथमच धनंजय मुंडे यांना विजय मिळाला. स्थानिक राष्ट्रवादी नेत्यांची मोट बांधून भाजपला एकगठ्ठा मतदान मिळणाऱ्या गावात राष्ट्रवादीला मतांची आघाडी मिळवून देण्यात यश मिळविले. वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र असलेल्या सिरसाळा गणातील गावात वर्षांनुवर्षे खासदार मुंडे यांना एकगठ्ठा मते देणारी गावे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रेवलीत राष्ट्रवादी उमेदवाराने ९६ मतांची आघाडी घेतली. वाका, औरंगपूर, तपोवन, मन्नतपूर या गावांतही राष्ट्रवादीला चांगली मते मिळाली. भाजपकडे कार्यकर्त्यांची फौज असली तरी या निवडणूक प्रक्रियेत खासदार मुंडे प्रत्यक्ष उतरले नव्हते.
संग्रहित लेख, दिनांक 27th Jun 2013 रोजी प्रकाशित
सिरसाळा निकालाचा अन्वयार्थ
जिल्हय़ाच्या राजकीय वर्तुळात बहुचर्चित व लक्षवेधी ठरलेल्या सिरसाळा गणात भाजपचा उमेदवार १ हजार ४०० मतांनी विजयी झाला असताना १६ महिन्यांनंतर झालेल्या पोटनिवडणुकीत मात्र २०० मतांनी भाजपला पराभव पत्करावा लागला.

First published on: 27-06-2013 at 01:50 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Purport of sirsala result