पादचारी पूल, सरकते जिने, स्वच्छतागृहांची संख्या वाढविण्यासारख्या तोंडी लावण्यापुरत्या सुविधा वगळता मुंबईकरांचा प्रवास सुखकर करणाऱ्या मोठय़ा प्रकल्पांची रेल्वेच्या अर्थसंकल्पात उपेक्षाच करण्यात आल्याने रेल्वे अर्थसंकल्पात मुंबईकडे दुर्लक्ष झाल्याची मुंबईकरांची भावना आहे.
दादरवरील ताण कमी करण्यासाठी नवीन परळ टर्मिनस, कल्याण टर्मिनस, ठाणे रेल्वे स्थानकाचे विस्तारीकरण, चर्चगेट-विरार आणि सीएसटी-पनवेल उन्नत मार्ग आणि त्याचबरोबर ‘एमयूटीपी’ आदी मुंबईशी संबंधित कामांच्या गाडीला ‘दे धक्का’ मिळणार का? याकडे प्रवाशांचे लक्ष लागले होते. मात्र, रेल्वे स्थानकांवरील पादचारी पुलांची, सरकत्या जिन्यांची, स्वच्छतागृहांची संख्या वाढविण्याबाबत रेल्वे मंत्र्यांनी दिलेली आश्वासने वगळता या सर्व महत्त्वाच्या योजनांबाबत कोणतेही भाष्य २०१४ च्या रेल्वे अर्थसंकल्पात करण्यात आलेले नाही. प्रवाशांना यापुढे टप्प्याटप्प्याने रेल्वे दरवाढीलाही समोरे जावे लागणार असल्याचे सूतोवाच रेल्वे मंत्र्यांनी केले आहे. पण, हे करताना मुंबईकरांशी संबंधित इतर योजनांच्या बाबत पाने पुसण्यात आली आहेत. अपघात टाळण्याकरिता नव्या लोकलच्या डब्यांचे दरवाजे गाडी सुरू होताच आपोआप बंद होतील, असे जाहीर झाल्यानंतर याबाबत मुंबईकरांमध्ये विविध मतांतरे उमटली आहेत. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहून नेणाऱ्या उपनगरीय रेल्वेमध्ये या प्रकारचे स्वयंचलित दरवाजे उपयोगाचे नाहीत, असे मत प्रवासी व्यक्त करीत आहेत. त्यामुळे, या सुविधेचे प्रवासी कसे स्वागत करतील या बाबत शंका आहे.

आमच्या मते..
 मुंबईकरांची निराशा
मुंबईकरांसाठी रेल्वे अर्थसंकल्पात कोणतीही आकर्षक तरतूद नसल्यामुळे नवीन सरकारकडूनही निराशाच पदरी आली आहे. या सरकारकडून खूप अपेक्षा होत्या. पण तसे काहीच झालेले नाही. मुंबईला नवीन डबे देणार असतील तर सर्व गाडय़ा १५ डब्यांच्या व्हायला हव्यात. याशिवाय ठाणे स्थानकाचे विस्तारीकरण तसेच कल्याण टर्मिनस यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद होणे अपेक्षित होते. मात्र तसे काहीच झाले नाही. यामुळे हा अर्थसंकल्प निराशाजनक असल्याचे मला वाटते.   –
आमोद बाबर

संकल्प चांगला
या रेल्वे अर्थसंकल्पाचे वैशिष्टय़ म्हणजे प्रवास करताना सामान्यांना ज्या समस्या भेडसावतात त्याच्याकडे लक्ष दिले गेले आहे. उदाहणार्थ रेल्वे स्थानकांवरील स्वच्छतागृहे, स्वच्छ पाणी, रेल्वे डब्यांची स्वच्छता आणि त्यातील जेवण यासारख्या सुविधांकडे विशेष लक्ष पुरवून त्यासाठी तरतूद करण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर प्रशासनाच्या कामावर यंत्रणेबाहेरील संस्थांकडून देखरेख ठेवण्याची घोषणाही खूप चांगली आहे. यामुळे प्रशासनाचे काम सुधारण्यास नक्कीच मदत होईल परिणामी लोकांना चांगली सेवा मिळू शकेल. ऑनलाइन बुकिंगमध्ये कलेल्या सुविधांचेही स्वागत करायला हवे. मुंबईच्या उपनगरीय सेवेकडे म्हणावे तेवढे लक्ष दिले नसले तरीही नवीन गाडय़ा आणि लोकलचे नवीन डबे देण्यात आले आहेत. यामुळे एकूण हा अर्थसंकल्प आजपर्यंतच्या रेल्वे अर्थसंकल्पांपेक्षा वेगळा वाटतो. –
तनय कुलकर्णी

सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवून फायदा काय?
रेल्वेमध्ये सुरक्षा रक्षकांचे नेमके काय काम असते हे माहीत नाही. ते तर स्थानकांवर झोपलेले असतात किंवा गप्पा मारत असतात. उगाच त्यांची संख्या वाढवून त्यांना फुकट पेन्शन द्यायची सोय का करायची? रेल्वे प्रवाशांची संख्या इतकी आहे की कितीही सुरक्षा रक्षक वाढवले तरी कमी पडतील.     
अपूर्वा टके

हेतू तसा चांगला..
लोकलचे दार बंद करण्यामागचा सुरक्षेचा हेतू नक्कीच चांगला आहे. मेट्रोमध्ये तशीच यंत्रणा आहे. मात्र लाखो प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या लोकलमध्ये ते शक्य होईल, असे वाटत नाही. लोकल स्थानकात येतायेताच प्रवासी खाली उडय़ा मारतात. लोकल पूर्ण थांबेपर्यंत दरवाजे उघडणार नसतील तर चढउतारासाठी अधिक वेळ द्यावा लागेल. त्यामुळे आधीच दोन-तीन मिनिटांच्या अंतराने धावत असलेल्या लोकलचे टाइमटेबल कोलमडेल. चर्चगेट-विरार उन्नत मार्ग अजून पुढे सरकलेला नाही. हा मार्ग होणार नसेल तर नवी मुंबईच्या धर्तीवर स्थानकांवर मजले बांधून निधी उभारता येईल, त्यामुळे तिकीटांचे शुल्क नियंत्रणात राहू शकेल.
मदन नवाळे

दरवाजात लटकण्याचे प्रमाण कमी होईल
सुरक्षा रक्षक नको, पण स्वयंचलित दरवाजे हवेत. त्यामुळे दरवाजात लटकण्याचे प्रमाण कमी होईल. तसेच प्रवाशांची संख्या मर्यादित असायला हवी. जेणेकरून पडण्याचे आणि पर्यायाने अपघातांचे प्रमाण कमी होईल. स्वच्छतेबाबत अधिक सुविधा करण्याऐवजी लोकांमध्ये जागरुकता वाढवणे गरजेचे आहे.
शीतल साठे

भिकाऱ्यांना हटकले पाहिजे
रेल्वेचे सुरक्षा रक्षक कामाच्या नावावर स्थानकांवर फिरत असतात. त्यांच्यावर लक्ष देण्यासाठी अधिकाऱ्यांची गरज आहे. डब्यात येणारे भिकारी आणि तृतीयपंथी यांच्यावर नियंत्रण असणे गरजेचे आहे. त्यांच्या दादागिरीवर आळा घातला पाहिजे.      प्रियांका पाटील
लोकलची संख्या वाढवा
‘बुलेट ट्रेन चालु करण्याऐवजी मुंबईतील लोकलच्या संख्या वाढवण्याची गरज आहे. गुजरातला जाणारे प्रवासी आजही आनंदाने प्रवास करतात. त्यांना बुलेट ट्रेन देण्याऐवजी लोकल ट्रेनची संख्या वाढवणे गरजेचे आहे.’   
  वृषाली आंगविलकर

दारे बिघडतील..
लोकलमध्ये दारात उभे राहून प्रवास करायची सवय अनेकांना असते. गाडय़ा एवढय़ा भरलेल्या असतात की हे प्रवासी दारात उभे राहून दार बंदच होऊ देणार नाही असे वाटते. त्यामुळे दार बिघडतील आणि गाडीही सुरू होणार नाही. या प्रवाशांना डब्यात ढकलून किंवा खाली उतरवून दार बंद करण्यासाठी पोलिसांची वेगळी फौज तयार ठेवावी लागेल. महिला डब्यांची संख्या वाढवली जाईल, अशी अपेक्षा होती. किमान सकाळ -संध्याकाळ धावणाऱ्या महिला विशेष लोकलची संख्या तरी वाढवायला हवी होती. पहिला डबा एवढा लहान आहे की चौपट पैसे भरूनही उभे राहून प्रवास करावा लागतो.  या सोयीबाबत महिलांना हे वर्षही चांगले ठरलेले नाही.                                                            
उषा गोडसे