सततची पावसाची रिपरिप व वातावरणातील ओलावा, यामुळे मूर्ती व्यवसाय संकटात सापडला आहे. अनेक दिवसांपासून जिल्ह्य़ात संततधार पाऊस येत आहे. अशातच श्रीकृष्ण जन्माष्टमी व गणेश चतुर्थीजवळ येऊन ठेपली आहे. या सणांसाठी मूर्तीकार श्रीकृष्ण व गणेश मूर्ती तयार करण्यात व्यस्त आहेत. परंतु, मातीच्या मूर्ती पाऊस व गारव्यामुळे वाळणे कठीण झाले आहे. त्यामुळे मूर्ती व्यावसायिक चिंताग्रस्त झाले असून मूर्ती वाळविण्यासाठी त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
शहरात जिल्ह्य़ासह, बाहेरील जिल्ह्य़ातूनही कुंभारकाम करणारे मूर्तीकार गेल्या महिन्यापासून दाखल झाले. सुरुवातीला त्यांना मातीसाठी भटकंती करावी लागली. कसेबसे काबाडकष्ट करून त्यांनी मातीच्या मूर्ती बनवायला सुरुवात केली. मात्र, जवळपास दोन महिन्यांपासून पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे मूर्ती वाळविण्याची नवी समस्या त्यांच्यासमोर उभी ठाकली आहे. महिनाभरापासूनच अनेक ग्राहकांनी आपल्या मनपसंद श्रीकृष्ण, गणेश मूर्तीची बुकिंग करून घेतली. बराच अवधी असल्याने मूर्तीकारांनीही मोठय़ा प्रमाणावर ऑर्डर घेतल्या व मूर्ती बनवायला सुरुवात केली. परंतु, सततच्या पावसामुळे सूर्यनारायणाचे दर्शन झालेच नाही. वातावरणातील ओलाव्यामुळे मातीच्या मूर्ती ओल्याच राहत असून त्या वाळल्याशिवाय त्यांची रंगरंगोटी करणे कठीण आहे.
पंख्याचा आधार घेऊन मूर्ती वाळविण्याचे प्रयत्न काही मूर्तीकार करीत असले तरी पावसाच्या सततच्या रिपरिपीमुळे मूर्ती व्यवसाय नक्कीच संकटात सापडला आहे. मातीच्या गोळ्यावर परिश्रमाचे घाम गाळून सुबक व आकर्षक मूर्ती तयार करणारा कुंभार समाज मातीच्या गोळ्याला हवा तसा आकार देत असला तरी स्वतच्या जीवनाला आकार देण्यात अपयशी ठरला आहे. प्रशासनानेही या व्यवसायाकडे दुर्लक्ष केले आहे.
यातच मातीची भांडी वापरातून बाद झाली आहेत. केवळ मूर्ती व्यवसाय चालत असून वाढत्या महागाईत या व्यवसायालाही योग्य मोबदला मिळत नाही. या समाजाच्या उत्थानासाठी शासनाने लक्ष देण्याची गरज आहे.