डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची गोळ्या झाडून हत्या झाल्याच्या पाश्र्वभूमीवर, मंगळवारी अंधश्रद्धा निर्मूलन समिती नाशिक शाखा, पुरोगामी विचारांचे राजकीय पक्ष आणि संघटनांनी मोर्चा काढून या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला. यावेळी कार्यकर्त्यांनी शालिमार चौकात रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. निषेध सभेत हल्लेखोरांना तात्काळ अटक करून त्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता हुतात्मा स्मारक येथे श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचे वृत्त समजल्यानंतर पुरोगामी संघटना व पक्षांचे कार्यकर्ते काही वेळातच जिल्हा न्यायालयासमोरील हुतात्मा स्मारकात जमले. अंनिसचे महेंद्र दातरंगे, कृष्णा पायगुडे, प्रा. लक्ष्मीकांत कावळे, माकपचे डॉ. डी. एल. कराड, श्रीधर देशपांडे, शेकापचे अ‍ॅड. मनीष बस्ते, राजू देसले यांच्यासह इतरही राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा त्यात समावेश होता. हुतात्मा स्मारकात निषेध सभा पार पडली. यावेळी सर्वानी डॉ. दाभोलकर यांच्या निर्घृण हत्येचा तीव्र शब्दात निषेध केला. ‘अंनिस’चे संस्थापक आणि ‘साधना’चे संपादक डॉ. दाभोलकर यांच्या हत्येमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. पुरोगामी महाराष्ट्रात जादूटोणाविरोधी विधेयक कायदा करावा यासाठी आयुष्यभर त्यांनी अहिंसेच्या मार्गाने लढा दिला, त्या महान व्यक्तीची हिंसेच्या मार्गाने हत्या व्हावी यापेक्षा दुसरी शरमेची बाब नसल्याची भावना यावेळी व्यक्त झाली. जादूटोणाविरोधी विधेयकामुळे अनेकांची दुकानदारी बंद होणार होती. त्यामुळे अशा सनातनवाद्यांनी त्यांची हत्या घडवून आणल्याचा आरोप अंनिसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केला. हल्लेखोरांना अटक करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणीही करण्यात आली.
यावेळी अंनिसचे दातरंगे यांना शोक अनावर झाला. त्यांना भावना व्यक्त करणे अवघड बनले. सनातनी संस्थांनी या माध्यमातून पुरोगामी चळवळीवर हल्ला चढविला असल्याची भावना यावेळी व्यक्त झाली. या हल्ल्याच्या निषेधार्थ काळ्या फिती लावून मोर्चा काढण्यात आला. हुतात्मा स्मारकापासून निघालेला निषेध मोर्चा सीबीएस, शालिमार, महात्मा गांधी रोडवरून शालिमार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आला. या ठिकाणी काही कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या मारून हल्लेखोरांना त्वरित अटक करण्याची मागणी केली. पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलकांना वाहनात बसविले. यावरून काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी ज्येष्ठांनी मध्यस्ती करून ही वेळ आंदोलनाची नसल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी सर्वाना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले.