शाहीर लोककलावंतांच्या मानधनात दरमहा पाच हजार रुपयांची वाढ करण्यात यावी, वयाची अट चाळीस वष्रे ग्राह्य़ धरण्यात यावी, वृध्द साहित्यिक व लोककलावंतांचे अर्ज तत्काळ निकाली काढण्यात यावे, मानधन समितीची बैठक तीन महिन्यातून एक वेळा आयोजित करण्यात यावी, यासह इतर मागण्यांसाठी बुधवारी शाहीर लोककलावंतांचा क्रांतिकारी मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला.
नियोजित वेळेपेक्षा एक तास उशिराने सुरू झालेला हा मोर्चा शहरातील गांधी भवनातून  काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व मराठी शाहीर परिषदेचे केंद्रीय उपाध्यक्ष शाहीर प्रेमसागर कांबळे यांनी केले होते. हा मोर्चा जयस्तंभ चौक, बाजार लाईन, सराफा गल्ली, कारंजा चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला. या मोर्चात जिल्ह्य़ातील वाघेमुरळी, एकतारी भजन, कीर्तन, ढोलाचे भजन, ओव्याचे भजन, संगीत नृत्य, कव्वाली, आंबेडकरी जलसा इत्यादी कलाक्षेत्रातील शेकडो शाहीर व लोककलावंत आपापल्या वाद्यांसह सहभागी झाले होते. मोर्चा दरम्यान शाहीर लोककलावंतांना एस.टी. व रेल्वे प्रवास भाडय़ात शंभर टक्के सवलत द्या, मुलामुलींना मोफत शिक्षण द्या, शाहीर लोककलावंतांना शहरी व ग्रामीण घरकुल योजनेत सामावून घ्या, अशा विविध घोषणा देऊन मोर्चेकऱ्यांनी शहर दणाणून सोडले होते.
जिल्हाधिकारी कार्यालयावर येताच मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत करण्यात आले. यावेळी शाहीर कांबळे यांनी लोककलावंतांना अल्पसे मानधन देण्यात येत असल्यामुळे त्यांना मानधनासह शासनाच्या इतर योजनापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे हे अर्ज तात्काळ निकाली काढण्यात यावे, अशी मागणी केली. त्यानंतर शाहीर हरिदास खांडेभराड, गजानन गायकवाड व दीपक महाराज सावळी यांनी मोर्चाला मार्गदर्शन केले. त्यानंतर शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या मोर्चात मराठी शाहीर परिषदेचे जिल्हाध्यक्ष शाहीर हरिदास खांडेभराड, आ.इंगळे गुरुजी, नारायण जाधव, सुभाष काकडे, प्रकाश थोरात, रामधन धुरंदर, जगदिश बोरकर, रेखा खरात, विजय परघरमोर यांच्यासह अनेक शाहीर लोककलावंत सहभागी झाले होते.