चिंचवडमधील आदित्य बिर्ला मेमोरियल रुग्णालय व रुग्ण यांच्यात झालेल्या वादामुळे ‘खासगी आरोग्य सेवांच्या शुल्काचे दरपत्रक असावे का’ हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याबाबत पुण्यातील डॉक्टरांशी संपर्क साधला असता, त्यांनी संमिश्र प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. आरोग्य सेवांचे दरपत्रक ठरवायलाच हवे, अशी भूमिका काहींनी घेतली, तर उपचारांत आयत्या वेळी अनेक बाबींचा समावेश होत असल्याने असे दरपत्रक ठरविणे
व्यवहार्य नाही, असे मत काहींनी व्यक्त केले आहे.
चिंचवडमध्ये रुग्णालयाने अनावश्यक उपचार करून अवाजवी शुल्क आकारल्याचा आरोप करीत रुग्णाने शुल्क भरणे नाकारले होते, तर रुग्णाला आवश्यक गोष्टींची पूर्वकल्पना दिली होती, आकारलेले शुल्कही योग्य आहे असे म्हणत रुग्णालयाने रुग्णाविरुद्धच तक्रार केली. या पाश्र्वभूमीवर खासगी रुग्णालयांसाठी काही दर मार्गदर्शिका असावी का, रुग्णालयांनी दरपत्रकच प्रसिद्ध करावे का, रुग्णावर कोणते उपचार करावेत यासाठीही मार्गदर्शिका असावी का, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.
याबाबत डॉ. अनंत फडके म्हणाले, ‘‘सध्यातरी खासगी रुग्णालयांच्या शुल्क आकारणीवर कोणतेही बंधन नाही. यासाठी कोणताही कायदा तसेच मार्गदर्शक तत्त्वेही अस्तित्वात नाहीत. परंतु केंद्राने संमत केलेल्या ‘मेडिकल एस्टॅब्लिशमेंट अ‍ॅक्ट’मध्ये अशा काही तरतुदी आहेत. तो महाराष्ट्रात राबविण्यासाठी त्याला राज्य विधानसभेत मंजुरी मिळावी लागेल. या कायद्यात खासगी आरोग्य सेवांचे शुल्क केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या मर्यादेतच आकारण्याची तरतूद आहे. तसेच, रुग्णालयांनी आरोग्य सेवांचे दरपत्रक प्रसिद्ध करून ते रुग्णांना दिसेल अशा ठिकाणी लावण्याचाही त्यात उल्लेख आहे. व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी हा पर्याय योग्य ठरू शकेल. रुग्णाला परिस्थितीचा अंदाज घेता यावा यासाठी त्याला उपचारांच्या खर्चाची पूर्वकल्पना देणे चांगले. काही रुग्णालये अशी पूर्वकल्पना देतातही, पण सर्वच रुग्णालये ही बाब पाळत
नाहीत.’’
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पुणे शाखेच्या अध्यक्ष डॉ. भारती ढोरे पाटील म्हणाल्या, ‘‘वैद्यकीय उपचारांच्या खर्चाचे दरपत्रक आधी ठरविणे अवघड आहे. या खर्चात अनेक लहान-लहान बाबींचा आयत्या वेळी समावेश होऊ शकतो. त्यामुळे खर्चातही बदल होऊ शकतो. डॉक्टर आणि रुग्णामधील संवाद वाढणे आवश्यक आहे. रुग्णांनी उपचांरांआधी डॉक्टरांकडून सर्व समाविष्ट बाबी समजून घ्यायला हव्यात.’’
‘क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट अ‍ॅक्ट’मधील तरतुदी
केंद्राच्या या अ‍ॅक्टमध्ये रुग्णालयातील प्रातिनिधिक आरोग्य सेवांचे दरपत्रक अर्थात खाटेचे भाडे, तपासणी फी, प्रयोगशाळा तपासण्यांचे दर, आयसीयूचे दरपत्रक, प्रमुख शस्त्रक्रियांचे अंदाजे दर इ. प्रसिद्ध करून ते रुग्णालयाच्या दर्शनी भागात लावण्याची तरतूद आहे. तसेच खासगी सेवांचे शुल्कही केंद्राने ठरवून दिलेल्या मर्यादेतच आकारण्याचे बंधनही या कायद्यात आहे. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी उपचारांसाठी प्रमाणित उपचार मार्गदर्शिका तयार करण्याच्या तरतुदीचाही कायद्यात समावेश आहे.