शहरातील रेंगाळलेला उड्डाणपूल अखेर मार्गी लागला आहे. राज्य सरकारच्या अंदाजपत्रकातून त्यासाठी खास तरतूद करण्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी सोमवारी मान्य केले. मात्र त्यामुळे या रस्त्याच्या विकसकाच्या टोलवसुलीला काही वर्षांची कात्री लावण्यात येणार आहे.
महापौर संग्राम जगताप यांनी ही माहिती दिली. स्टेशन रस्त्यावरील रेंगाळलेल्या उड्डाणपुलाच्या कामाबाबत मुंबईत भुजबळ यांच्या दालनात सोमवारी बैठक झाली. या बैठकीस जगताप व या विभागाचे अधिकारी तसेच नगर ते शिरूर रस्त्याचा विकसकही उपस्थित होता.
जगताप यांनी सांगितले, की रस्त्याच्या विकसकाने या बैठकीतही शहरातील स्टेशन रस्त्यावरील उड्डाणपुलाबाबत असमर्थताच दर्शवली. सार्वजनिक बांधकाम विभागाने दाखल केलेल्या याचिकेत नगरच्या न्यायालयात तसेच उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातही त्याच्या विरोधात निकाल देण्यात आला आहे. मात्र या बैठकीतही विकसकाने काम करण्यास असमर्थता दर्शवली. नगर ते शिरूर या रस्त्याच्या चौपदरीकरणातील हे काम प्रशासनाच्या कमतरतांमुळेच लांबले असून आता उड्डाणपुलाचा खर्च काही पटींनी वाढला आहे. त्यामुळे त्या वेळच्या खर्चात उड्डाणपूल बांधणे शक्य नाही हे त्याने स्पष्ट केले. याच कारणावरून भुजबळ यांनी त्याला चांगलेच धारेवर धरल्याचे समजते. अखेर नगर ते शिरूर या रस्त्याच्या टोलवसुलीतील विकसकाचा काही काळ कमी करून राज्य सरकारच्याच अंदाजपत्रकातून शहरातील हा उड्डाणपूल बांधण्यास भुजबळ यांनी मंजुरी दिली.
या निर्णयानुसार नगर ते शिरूर या रस्त्याच्या पंधरा वर्षांच्या टोलवसुलीतून आता काही काळ कमी करण्यात येणार आहे. दोन ते चार वर्षांनी हा काळ कमी करून विकसकाऐवजी राज्य सरकारच्याच निधीतून उड्डाणपुलाची उभारणी केली जाईल. राज्याच्या या अर्थसंकल्पातच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निधीतून ही तरतूद करण्यात येईल असे भुजबळ यांनी सांगितले. अर्थसंकल्पानंतर लगेचच निविदा काढून हे काम पूर्ण करण्यात येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान उड्डाणपुलाच्या कामाबाबत या विकसकाने असमर्थता दर्शवली असली तरी स्टेशन रस्त्यावरील (नगर कॉलेज ते यश पॅलेस) भूमिगत जलवाहिन्या आणि ड्रेनेजच्या वाहिन्या रस्त्याच्या मधून अन्यत्र स्थलांतरित करून देण्याची तयारी या विकसकाने दर्शवली आहे. बैठकीतच तसे त्याने मान्य केले. या कामासाठी साधारणपणे सहा ते सात कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे अशी माहिती जगताप यांनी दिली. याच पद्धतीने नगर ते कोल्हार रस्त्याच्या विकसकाकडेही विळद पंपिंग स्टेशन ते संजोग हॉटेल येथील वाहिन्या स्थलांतरित करून देण्याची मागणी मनपाने केली आहे असे त्यांनी सांगितले.
चौक सुशोभीकरणालाही निधी
कल्याण-विशाखापट्टणमसह महत्त्वाचे सहा राज्यमार्ग शहरातून जातात. या सहाही राज्यमार्गावर मोठी रहदारी असते. या राज्यमार्गांना येऊन मिळणा-या शहरातील सर्व चौकांचे सुशोभीकरण व वाहतूक बेटे विकसित करण्यासाठी राज्य सरकारकडून निधी मिळावा अशी मागणी भुजबळ यांच्याकडे करण्यात आली. भुजबळ यांनी ती मान्य केल्याचे जगताप यांनी सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभागाकडूनच त्यासाठी आता निधी मिळेल असे ते म्हणाले.
संग्रहित लेख, दिनांक 19th Feb 2014 रोजी प्रकाशित
राज्याच्या निधीतून उड्डाणपुलास मान्यता
शहरातील रेंगाळलेला उड्डाणपूल अखेर मार्गी लागला आहे. राज्य सरकारच्या अंदाजपत्रकातून त्यासाठी खास तरतूद करण्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी सोमवारी मान्य केले. मात्र त्यामुळे या रस्त्याच्या विकसकाच्या टोलवसुलीला काही वर्षांची कात्री लावण्यात येणार आहे.
First published on: 19-02-2014 at 03:20 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Recognition of the state funds to bridge