* रोषणाई, आतषबाजीच्या खर्चाला फाटा
* शोभायात्रेचा निधी दुष्काळग्रस्तांना देणार
पश्चिम नागपूर नागरिक संघ आणि श्री राम जन्मोत्सव शोभायात्रा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दरवषीप्रमाणे यावर्षी श्रीरामजन्मोत्सवनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आणि पारंपरिक शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले असून यंदा ५० पेक्षा जास्त चित्ररथ आणि विविध राज्यातील लोकनृत्य कलाकार सहभागी होणार असल्याची माहिती शोभायात्रा समिताचे संयोजक प्रवीण महाजन यांनी दिली.
पश्चिम नागपुरात १९७३ पासून रामनवमीनमित्त शोभायात्रेचे आयोजन केले जात असून दिवसेंदिवस या भागातील नागरिकांचा प्रतिसाद मोठय़ा प्रमाणात मिळतो. राज्यात दुष्काळाची परिस्थिती असताना शोभायात्रेवर होणारा अनाठायी खर्च टाळून यावेळेची शोभायात्रा निघणार आहे.यंदा शोभायात्रेच्या मार्गावर करण्यात येणारी आकर्षक रोषणाई करण्यात येणार नाही. याशिवाय रामनवमीच्या दुसऱ्या दिवशी होणारा महाप्रसाद वितरणाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. शोभायात्रेतून जो काही निधी शिल्लक राहणार आहे तो विदर्भातील दुष्काळग्रस्त भागासाठी खर्च करण्यात येणार आहे. शोभायात्रेच्या संयोजकपदी प्रशांत पवार, कार्याध्यक्ष म्हणून समीर मेघे, स्वागताध्यक्षपदी अविनाश ठाकरे तर निमंत्रक म्हणून डॉ. पिनाक दंदे यांची निवड करण्यात आली आहे. यानिमित्ताने ११ एप्रिलला गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला भजन कल्लोळाचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज सकाळी काकड आरती, दुपारी भजन आणि सायंकाळी चिन्मयानंद बापूजी यांची संगीतमय श्रीरामकथा होणार आहे. गुढीपाडवा ते रामनवमी या कालावधीत रोज सकाळी प्रभातफेरी निघणार आहे. यानंतर १९ एप्रिलला सकाळी १० ते १२ श्रीराम जन्मोत्सव होणार असून दुपारी ३ वाजता वैद्यकीय क्षेत्रातील २१ डॉक्टर्स दांपत्यांच्या हस्ते वसंतपूजा होणार आहे.
सायंकाळी ५ वाजता महापौर अनिल सोले यांच्या हस्ते रथाची पूजा करण्यात येईल. यावेळी भारतीय जनता पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी, खासदार विलास मुत्तेमवार, अजय संचेती, ऊर्जा राज्यमंत्री राजेंद्र मुळक, आमदार देवेंद्र फडणवीस, सुधाकर देशमुख, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक प्रफ्फुलकुमार झपके, विनय कुळकर्णी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.  
शोभायात्रेच्या मार्गावर विविध व्यापारी आणि काही सामाजिक संघटनांनी प्रवेशद्वार उभारण्याची इच्छा व्यक्त केली असता महापालिकेने यंदा परवानगी नाकारली आहे. यावेळी शोभायात्रेच्या मार्गावर ८८ प्रवेशद्वारे उभारण्यात येणार असल्याचे पत्र महापालिका आयुक्तांना दिल्यानंतर त्यांनी न्यायालयाच्या निर्देशानुसार परवानगी देता येत नसल्याचे सांगितले. यासंदर्भात जिल्हाधिकारी आणि महापौरांना निवेदन देण्यात आले असून न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असल्याची माहिती महाजन यांनी दिली.