गेल्या २२ वर्षांमध्ये लोकसंख्येत प्रचंड वाढ झाल्यामुळे मुंबईतील बॅचधारक ऑटोरिक्षा चालकांसाठी तब्बल १ लाख २० हजार रिक्षा परवान्यांचे वाटप करण्याच्या मागणीसाठी मुंबई ऑटोरिक्षामेन्स युनियनचे अध्यक्ष शरद राव यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले असून १ फेब्रुवारी रोजी वांद्रे येथे धरणे धरण्याचा इशारा दिला आहे.
१९९१ मध्ये झालेल्या जनगणनेत मुंबईत ९९,२५,८९१ लोकसंख्या असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर १९९७ मध्ये सरकारने ९७ हजार ऑटोरिक्षा परवान्यांचे वितरण केले. २०११ मध्ये झालेल्या जनगणनेत मुंबईची लोकसंख्येत ३० टक्क्य़ांनी वाढल्याचे समोर आले आहे. तसेच शहरातील ५० टक्क्य़ांहून अधिक नागरिक उपनगरांमध्ये स्थलांतरित झाले आहेत. परिणामी उपनगरांच्या लोकसंख्येत ७० ते ८० टक्क्य़ांनी वाढली आहे. उपनगरांमध्ये प्रवाशांना झटपट इच्छितस्थळी पोहोचविणाऱ्या रिक्षाच्या परवान्यांच्या संख्येत ७० हजारांहून अधिक वाढ होणे गरजेचे आहे. महाराष्ट्रामध्ये ७.५ लाखांहून अधिक रिक्षा धावत असून त्यामुळे सुमारे १५ लाख चालकांना रोजगार मिळाला आहे. तसेच या व्यवसायामुळे तब्बल २२ लाखांहून अधिक लोकांचा उदरनिर्वाह होत आहे, अशी माहिती शरद राव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन सरकारने १ लाख रिक्षा परवान्यांचे वितरण करावे, तसेच मृत झालेल्या २० हजार परवान्यांचे नूतनीकरण करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच परवान्यांच्या वितरणासाठी रिक्षा बॅजधारकांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे. बहुतांश रिक्षाचालक अशिक्षित असून त्यांना संगणकाचे ज्ञान नाही. ऑनलाईन अर्ज भरताना तात्रिक चूक आल्यास संबंधितास पुन्हा अर्ज भरता येत नाही. त्यामुळे परवाना मिळविण्याची संधी हुकते. त्यामुळे पारंपरिक पद्धतीने अर्ज भरण्याची सुविधाही उपलब्ध करावी, असेही ते म्हणाले.
प्रधान सचिव (परिवहन) आणि परिवहन आयुक्त अपुऱ्या माहितीच्या आधारे परवान्यांच्या वितरणांमध्ये लुडबुड करीत असून या द्वयीने २७ जानेवारीपासून अचानक अर्ज भरण्यास चालकांना भाग पाडले, असा आरोपही त्यांनी केला. राज्य सरकारने या मागण्यांचा तातडीने विचार करावा अन्यथा १ फेब्रुवारी रोजी वांद्रे येथील परिवनह आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर धरण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. मात्र या दिवशी रिक्षा बंद ठेवण्यात येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.