प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत १२ वर्षांपूर्वी ग्रामीण भागात झालेले रस्ते अतिशय खिळखिळे झाले आहेत. रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. कोटय़वधी रुपये खर्च करून झालेली कामे चांगली असल्याने वाहतुकीस त्याचा अडथळा होत नसल्याचा दावा ग्रामसडक योजनेतील अधिकाऱ्यांनी केला आहे.
बीड जिल्हय़ात अकरा तालुक्यांमध्ये प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत २००२ ते २००९ या कालावधीत १६८ गावांमध्ये रस्त्यांची कामे झाली. यामध्ये बीड-२३, परळी-२०, अंबाजोगाई-१२, शिरूर-७, माजलगाव-१९, गेवराई-२७, केज-७, किल्लेधारूर-३, वडवणी-७, पाटोदा-११, आष्टी-२० गावांचा समावेश आहे. तब्बल १२ वर्षांपूर्वी रस्त्यांची झालेली कामे आजही सुस्थितीत असल्याचा दावा या योजनेच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. वास्तविक पाहता ग्रामीण भागातील रस्ते खड्डय़ांनी व्यापलेले आहेत. खड्डे दुरुस्तीसाठी थातूर-मातूर कामे करून ती मुरुम टाकून बुजवली जातात. वाहनांच्या वर्दळीने मुरुम बाजूला पडून खड्डे पुन्हा उघडे पडतात. अनेक रस्त्यांवर असलेल्या खड्डय़ांमुळे अपघातांच्या घटनाही घडलेल्या आहेत. रस्त्यांवरील खड्डे आजही कामाच्या प्रतीक्षेत आहेत. असे असताना प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतील अधिकाऱ्यांनी ‘ऑल इज वेल’चा शेरा मारून समस्येवर माहिती अधिकाराच्या कागदपत्रात पांघरून टाकल्याचे दिसून येते.