उरण येथे दरोडाप्रकरणी अटक असलेल्या दरोडेखोराला रायगड जिल्हा सत्र न्यायालयाने सात वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. १६ एप्रिल २०११ रोजी ही घटना घडली होती. 

वेश्वी गावात बिअर शॉपी चालविणारे सुनील तांबोळी कामानिमित्त पनवेल येथे गेले असता त्यांची पत्नी सुजाता या दुकानामागे असलेल्या घरात मुलाला अांघोळ घालीत असताना जबरदस्तीने घरात घुसलेल्या अनिल फुलचंद धिवर व राजन जयप्रकाश धिवर या दोघांनी धारदार चाकूचा धाक दाखवीत तिच्या गळ्यातील सोन्याची चैन व तिचा मोबाइल हिसकावून घेतला होता. या वेळी त्यांनी प्रतिकार केला असताना आरोपींनी त्यांच्या हातावर चाकूने वार केले होते.
सुजाताने प्रसंगावधान म्हणून आरडाओरडा केल्याने दोघांनीही पळ काढला मात्र त्यांचा पाठलाग करीत गावकरी त्यांच्या मागे लागल्याने ६५ वर्षीय राधा जोशी यांच्या घरात घुसून तिलाही चाकूचा धाक दाखवून वार करून जखमी केले होते. अखेरीस ग्रामस्थांनी दोघांनाही शिताफीने पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याने त्यांच्यावर दरोडय़ाचे गुन्हे दाखल केले होते. या गुन्ह्य़ाचा तपास उरणचे तत्कालीन साहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांनी केला होता. जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एच. ए. पाटील यांनी गुन्हेगाराला शिक्षा ठोठावली असून सरकारी वकील म्हणून कल्के यांनी काम पाहिले.
या गुन्ह्य़ातील दुसरा आरोपी बाल गुन्हेगार असल्याने त्याचा कर्जत न्यायालयात खटला प्रलंबित असल्याची माहिती दौंडकर यांनी दिली आहे.