लोकसभेचे निकाल लागण्यास आठ दिवसांचा अवधी असतानाच आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने नांदगाव, येवला, चांदवड मतदारसंघात राजकीय हालचालींना सुरूवात झाली आहे. महायुतीत सामील झालेल्या रिपाइंने (आठवले गट) नांदगावच्या जागेवर हक्क सांगितला आहे. तर, पंकज भुजबळांसाठी राष्ट्रवादीला सोडण्यात आलेली जागा पुन्हा काँग्रेसने परत मागितली आहे. येवला व चांदवड विधानसभा मतदारसंघातही अशीच परिस्थिती निर्माण झाल्याने राजकीय वातावरण पुन्हा ढवळून निघण्यास सुरूवात झाली आहे.
लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्याआधीच राजकीय पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. रिपाइंतर्फे रामदास आठवले यांनी नुकतीच आपल्या पक्षातील पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक घेतली. त्यात महायुतीतर्फे ३० जागा लढविण्यास रिपाइं तयार असून त्यात नांदगाव, देवळाली या दोन जागांसाठी आग्रह धरण्यात येणार असल्याची माहिती अविनाश महातेकर यांनी पत्रकारांना दिली. महायुतीला अनुकूल वातावरण असल्याचे पाहून रिपाइंने नांदगावच्या जागेसाठी हट्ट धरला आहे. याआधी रिपाइंची काँग्रेसबरोबर युती असताना आठवलेंच्या आग्रहास्तव नांदगावची जागा काँग्रेसने रिपाइंसाठी सोडल्याचा इतिहास आहे. त्याच पाश्र्वभूमीवर शेवटच्या क्षणी ही जागा महायुतीतर्फे रिपाइंसाठी सोडली जाण्याची चर्चा आहे.
दुसरीकडे आघाडीतही काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये धुसफूस सुरू झाली असून पंकज भुजबळांसाठी राष्ट्रवादीला सोडण्यात आलेली नांदगावची जागा पुन्हा आपणास मिळावी असा आग्रह तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांंनी धरला आहे. माजी आमदार अनिल आहेर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने यासाठी श्रेष्टींकडे आग्रह धरला आहे. राष्ट्रवादीची सत्ता तालुक्यात आल्यानंतर गेल्या साडेचार वर्षांत मनमाड व नांदगाव येथील नगरपालिका, बाजार समित्या, पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत आदी ठिकाणच्या राजकारणात काँग्रेस कार्यकर्त्यांना कायम अपमानास्पद व दुय्यम दर्जाची वागणूक मिळाली.
वास्तविक तालुक्यात तळागाळातील कार्यकर्त्यांचे खरे संघटन हे काँग्रेसकडेच आहे. राष्ट्रवादीकडे मात्र सर्वच ठिकाणी नेतेच नेते असल्याचे एका ज्येष्ठ काँग्रेस नेत्याने सांगितले.
गेल्यावेळी काँग्रेसने ही जागा राष्ट्रवादीस सोडली ही फार मोठी चूक झाल्याचा पश्चाताप आता काँग्रेसचे कार्यकर्ते गावागावातून व्यक्त करत आहेत. राष्ट्रवादीकडून होणारी ही मानहानी व अपमानास्पद वागणूक आणखी किती दिवस आपण सहन करणार असा प्रश्न तळागाळातील कार्यकर्ते तालुक्यातील तथाकथित काँग्रेस नेत्यांना करत आहेत. यामुळे नेत्यांची बोलती बंद झाली असून सहन होत नाही आणि सांगता येत नाही अशी द्विधा परिस्थिती नेत्यांची झाली आहे. काँग्रेसला पुन्हा सोनेरी दिवस मिळवून देण्यासाठी यावेळी काँग्रेसलाच नांदगावची जागा सोडावी असा आग्रह श्रेष्ठींकडे धरावा यासाठी कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी आतापासूनच कंबर कसली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर होणाऱ्या मोठय़ा राजकीय फेरबदलाचा फायदा आपआपल्या पक्षांना व कार्यकर्त्यांना मिळावा यासाठी येवला व चांदवड विधानसभा मतदारसंघातही ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. त्यामुळे नांदगाव, येवला व चांदवड मतदारसंघातील राजकीय वातावरण आता चांगलेच तापू लागले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 10th May 2014 रोजी प्रकाशित
नांदगावसाठी रिपाइं, काँग्रेस आग्रही
लोकसभेचे निकाल लागण्यास आठ दिवसांचा अवधी असतानाच आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने नांदगाव, येवला, चांदवड मतदारसंघात राजकीय हालचालींना सुरूवात झाली आहे.

First published on: 10-05-2014 at 08:49 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rpi congress alliance in nashik for assembly elections